Join us  

​यश चोप्रा यांची सून राणी मुखर्जी घरातील सदस्याप्रमाणेच उभी राहिली कपूर कुटुंबाच्या पाठिशी, यश राजसोबत श्रीदेवी यांचे होते खास नाते...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 9:30 AM

श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत यश राज फिल्मच्या लम्हे, चांदनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे यश चोप्रा यांच्यासोबतचे नाते ...

श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत यश राज फिल्मच्या लम्हे, चांदनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे यश चोप्रा यांच्यासोबतचे नाते खूपच चांगले होते. यश चोप्रा यांना श्रीदेवी आपल्या वडिलांप्रमाणे मानत. लम्हे या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरू असताना श्रीदेवी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. ही गोष्ट श्रीदेवी यांना सांगण्याची हिंमतच यश चोप्रा यांना होत नव्हती. त्यामुळे तुझ्या वडिलांना बरे नाहीये, तू लगेचच निघ असे सांगत त्यांनी श्रीदेवी यांना मुंबईला परत पाठवले होते. मुंबईला आल्यानंतर श्रीदेवी यांना ही गोष्ट कळली. श्रीदेवी या संपूर्णपणे खचून गेल्या होत्या. पण तरीही त्यांनी काहीच दिवसांत लम्हे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली. यश चोप्रा यांनी ही आठवण त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितली आहे.यश चोप्रा यांच्यासोबतच त्यांची पत्नी पॅमेला चोप्रा यांच्यासोबत देखील श्रीदेवीचे नाते खूपच चांगले होते. श्रीदेवी यांचे चोप्रा कुटुंबासोबत एक खास नाते होते. यश चोप्रा यांची सून राणी मुखर्जी श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनाच्या वेळी पूर्णवेळ तिथे उभी होती. कपूर कुटुंबीयातील प्रत्येकाला ती सांभाळत होती. तसेच अंतिम दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाशी एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच बोलत होती. यश चोप्रा यांचे श्रीदेवी सोबत असलेले नाते त्यांच्या सुनेने देखील कायम ठेवले.मंगळवारी रात्री बोनी कपूर आणि अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर एअरपोर्टवर उपस्थित होते. श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले होते. आता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.Also Read : भूतकाळ विसरून अर्जुन कपूर आणि अंशुलाने दिला जान्हवी, खुशीला आधार