गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ(Diljeet Dosanjh)साठी मागील वर्ष २०२४ खूप खास होते. या वर्षी दिलजीतने त्याच्या 'अमर सिंह चमकीला' चित्रपटात हृदय पिळवटून टाकणारा अभिनय केला आणि त्याला खूप प्रशंसा मिळाली. तसेच, दिलजीतचे संगीत दिल लुमिनाटी टूर देखील वर्षभर सुपरहिट ठरले आहे. आता दिलजीतने त्याच्या इंस्टाग्रामवर रक्ताने माखलेला चेहरा आणि धुळीने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहून चाहतेही चिंतेत पडले आहेत.
अभिनेता दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्याला काय झाले आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र हे फोटो दिलजीतच्या आगामी चित्रपटातील दृश्ये आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी अंदाज लावला की काही रोमांचक कथा तयार होत आहे जी लवकरच प्रेक्षकांसमोर येईल. हे फोटो शेअर करताना दिलजीतने लिहिले की, 'मी अंधाराला आव्हान देतो.'
दिलजीतचे हे फोटो त्याच्या आगामी 'जसवंत सिंग खलरा' यांच्यावरील बायोपिक 'पंजाब ९५' मधील असू शकतात. पंजाबचे मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा १९९५ मध्ये अचानक गायब झाले. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्याबद्दल कोणतीही बातमी आलेली नाही. त्याच्या बायोपिकची घोषणा २०२३ मध्ये झाली होती. ज्यामध्ये दिलजीत सिंग दोसांझ मुख्य भूमिकेत होता. आता दिलजीतची ही फोटो पाहता ही या चित्रपटाच्या सेटवरील फोटो असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण ही फोटो पाहून असे दिसते की, दिलजीत लवकरच त्याच्या चित्रपटाची घोषणा करू शकतो. हानी तेहरान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत अर्जुन रामपाल आणि जगजीत संधू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
जसवंत सिंग खलरा कोण होते?जसवंत सिंग खलरा हे एक धाडसी मानवाधिकार कार्यकर्ते होते ज्यांनी पंजाबमधील बंडखोरीदरम्यान हजारो शीख तरुणांच्या कथित न्यायबाह्य हत्यांचा पर्दाफाश केला. कार्यकर्त्यांच्या कुटुंबातून आलेल्या खलरा यांनी तपासाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये असे दिसून आले की पंजाब पोलिसांनी कोणतीही नोंद न ठेवता २५००० हून अधिक शिखांचे अपहरण केले, त्यांची हत्या केली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. राज्याच्या कामकाजात सहकार्य करण्यास नकार दिल्याने सुमारे २००० पोलिस अधिकारी मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला. खलरा १९९५ मध्ये गूढपणे गायब झाले आणि अखेरचा ते अमृतसरमध्ये दिसले. जवळपास एक दशकानंतर, सीबीआयच्या प्रदीर्घ तपासानंतर सहा पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या हत्येसाठी दोषी ठरविण्यात आले.