आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णविजेते तसेच भारतीय बॉक्सिंगला नवी दिशा देणारे बॉक्सर डिंकोसिंग ( Dingko Singh ) यांचे काल गुरुवारी वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. २०१७ पासून त्ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. ५४ किलोगटात(बँटम वेट) खेळणारे डिंको यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागणही झाली होती, पण त्यांनी या विषाणूवर मात केली होती. डिंकोसिंग यांच्या निधनावर अभिनेता शाहिद कपूर ( Shahid Kapoor ) याने शोक व्यक्त केला आहे. २०१९ मध्ये शाहिद डिंकोसिंग यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवणार होता. याद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याचा त्याचा विचार होता.
शाहिदने स्वत: डिंकोसिंग यांच्या बायोपिकचे संकेत दिले होते. एका मुलाखतीत तो यावर बोलला होता. आपल्याकडे डिंकोसिंग यांच्यावर सिनेमा बनवण्याचे अधिकार असल्याचे त्याने म्हटले होते. सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले होते. दिग्दर्शकाचीही निवड झाली होती. ‘एअरलिफ्ट’ व ‘शेफ’ सारखे सिनेमे दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन हा सिनेमा दिग्दर्शित करणार होते आणि लीड रोलमध्ये शाहिद कपूर दिसणार होता. पण पुढे या सिनेमाचे काम रखडले, ते आत्तापर्यंत.अर्थात शाहिद कपूरने म्हटल्याप्रमाणे, हा सिनेमा तो बनवणारचं. आता डिंकोसिंग या जगात नाहीत. त्यांना श्रद्धांजली म्हणून शाहिद या जबरदस्त बायोपिकचे काम सुरु करेन, अशी अपेद्वा करायला हरकत नाही.