Join us  

'मला इंडस्ट्रीतून बाहेर जावं लागेल'; जेव्हा राजेश खन्नांनी मागितली होती सलीम-जावेद यांच्याकडे मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:05 PM

Rajesh Khanna: त्या काळात राजेश खन्ना प्रचंड घाबरेल होते

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून अभिनेता राजेश खन्नाकडे (Rajesh Khanna) पाहिलं जातं. राजेश खन्नाने जो स्टारडम मिळवला तो आजतागायत कोणत्याही अभिनेत्याला मिळालेला नाही. १९६६ मध्ये इंडस्ट्री पदार्पण करणाऱ्या राजेश खन्ना यांनी काका म्हणून बरीच लोकप्रियता मिळवली. आपल्या सिनेमात त्यांना घेण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते त्यांच्या दारापुढे रांगा लावत होते. इतकंच नाही तर ते सांगतील ती रक्कम त्यांना द्यायला ते तयार व्हायचे. परंतु, त्यांच्या आयुष्यात असा एक काळ आला होता जेव्हा ते प्रचंड घाबरले होते. आपल्याला इंडस्ट्रीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी भिती त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे ते सलीम खान आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यासमोर अक्षरश: करिअर वाचवण्यासाठी मदत मागितली होती. 

जावेद अख्तर यांनी अरबाज खानच्या टॉक शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.राजेश खन्नामुळेच आम्ही श्रीमंती पाहिली. आमच्या कथा तो पडद्यावर उत्तमरित्या साकारत होता. ज्यामुळेच आम्हाला ६०-७० च्या काळात चांगली प्रसिद्धी मिळाली होती. परंतु, एक काळ असा आला जेव्हा राजेश खन्ना आमच्याकडे मदतीसाठी आला होता.

त्या काळात राजेश खन्नाला एक सिनेमा ऑफर झाला होता. ज्यासाठी त्याला ४ लाख रुपये इतकं मोठं मानधन मिळणार होतं. त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. त्यामुळे हा सिनेमा हातचा जाऊ नये असं राजेश खन्नाला वाटत होतं. निर्मात्यांनी राजेशला अडीच लाखांचा साइनिंग चेकही दिला होता. पण, त्यानंतर राजेश खन्नाला कळलं की सिनेमाचा दुसरा हाफ तर तयार झालेला नाहीत. त्यामुळे राजेश खन्ना या प्रकरणात चांगलेच फसले गेले. त्याच काळात त्यांनी मुंबईच्या कार्टर रोड येथे ४ लाखांचा बंगला विकत घेतला होता, असं जावेद अख्तर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "जर राजेश खन्नाने हे चार लाख परत केले तर त्यांच्या हातून बंगला निसटणार होता.  आणि, एवढी मोठी रक्कम ते निर्मात्यांना परत सुद्धा करु इच्छित नव्हते. त्यामुळे तो सलीम आणि माझ्याकडे आला. राजेश खन्नाला ऑफर झालेला तो सिनेमा होता हाथी मेरे साथी. रमेश सिप्पी यांनी तो दिग्दर्शित केला होता. या सिनेमाचा अर्धा पार्ट मी आणि सलीमने लिहिला होता."

"एकदा तो सलीमसोबत माझ्याकडे आला आणि म्हणाला, माझी फार मोठी अडचण झालीये. मी कर्टर रोडवर घर विकत घेतोय. हे घर खूप महाग आहे. साडे चार लाखांचं आहे. आणि, त्यात निर्मात्यांनी मला एवढी मोठी रक्कम दिलीये की मी ती परत करु शकत नाही. मुळात जर मी या अर्ध्या झालेल्या स्क्रिप्टवर काम केलं तर मला इंडस्ट्रीतून बाहेर जावं लागेल. त्यामुळे आता तुमच्याच हातात आहे. की ही स्क्रिप्ट पूर्ण करा. ज्यामुळे मला या सिनेमात काम करता येईल."

दरम्यान, त्यानंतर सलीम-जावेदने या सिनेमाची स्क्रिप्ट पाहिली आणि मग त्याचा दुसरा पार्ट पूर्णपणे बदलून तयार केला. विशेष म्हणजे ही स्क्रिप्ट लिहितांना त्यांनी मेकर्स समोर २ अटी ठेवल्या. त्यात पहिली अट म्हणजे सिनेमाचा हिरो राजेश खन्नाच असेल. आणि, केवळ ४ हत्ती आहेत तेच ठेवले जातील आणि बाकीचे बदलण्यात येतील. या अटींमुळे हाती मेरे साथी सिनेमा तयारही झाला आणि राजेश खन्ना यांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवारही दूर झाली.

टॅग्स :राजेश खन्नासलीम खानजावेद अख्तरबॉलिवूड