Join us  

या कारणामुळे १५ वर्षं मीडियाने टाकला होता अमिताभ बच्चन यांच्यावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 3:16 PM

अमिताभ बच्चन यांच्यावर तर १५ वर्षं तरी पत्रकारांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता.

ठळक मुद्देआणीबाणीत प्रेसवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी घालण्याबाबत मी सुचवले होते असे काही वर्तमानपत्रात त्यावेळी छापून आले होते. यामुळे सगळ्याच वर्तमानपत्रांनी माझ्यावर बहिष्कार टाकला होता. 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकारातील भांडण तूर्तास तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. या वादानंतर एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहील, असे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला होता. मीडियाला विकाऊ आणि देशद्रोही म्हणायलाही कंगना कचरली नाही. त्यानंतर तर कंगनाने तिच्या वकिलांमार्फत पत्रकारांना थेट नोटिस पाठवली होती. या नोटिसमध्ये काही पत्रकार काहीही कारण नसताना कंगनाची बदनामी करत असून ते अनप्रोफेशनल जर्नालिस्ट आहेत असे देखील म्हणण्यात आले होते.

कंगनावरच नव्हे तर याआधी अनेक कलाकारांवर देखील मीडियाने बहिष्कार टाकला होता. अमिताभ बच्चन यांच्यावर तर १५ वर्षं तरी पत्रकारांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनीच काही वर्षांपूर्वी त्यांच्या ब्लॉगवर याविषयी लिहिले होते. त्यांनी लिहिले होते की, मी अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम केले. त्यावेळी पत्रकारांचा खूप चांगला पाठिंबा मला मिळाला होता. त्यानंतर आणीबाणीत प्रेसवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी घालण्याबाबत मी सुचवले होते असे काही वर्तमानपत्रात त्यावेळी छापून आले होते. यामुळे सगळ्याच वर्तमानपत्रांनी माझ्यावर बहिष्कार टाकला होता. 

मी यात खरंच सहभागी होतो की नाही याचा तपास देखील करण्यात आला नाही आणि माझ्या मुलाखती, माझे फोटो, माझ्या बातम्या, माझ्या संदर्भातील प्रत्येक गोष्टीवर मीडियाकडून बंदी घालण्यात आली. दीवार, शराबी, मुक्कदर का सिकंदर, लावारिस, नटवरलाल, बेमिसाल यांसारख्या माझ्या अनेक चित्रपटांना या बंदीमुळे प्रमोशनची संधीच मिळाली नाही. खरं बघायला गेले, तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्यावर घातलेली बंदी योग्य होती. पण या सगळ्यामुळे मी त्या काळात अनेक हिट चित्रपट देत असलो तरी माझ्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केले जात होते. 

कुली या चित्रपटाच्यावेळी मला दुखापत झाली आणि त्यावेळी माझ्या तब्येतीविषयी सामान्य लोकांनाच नव्हे तर मीडियाला देखील चिंता वाटायला लागली. त्यानंतर काही काळानंतर आमच्यातील हा वाद मिटला. 

टॅग्स :अमिताभ बच्चन