Join us  

जाणून घ्या चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांचे पुढे काय होते, सांगतेय ही स्टायलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 12:03 PM

चित्रीकरणानंतर या कपड्यांचे काय होते हे खुद्द एका फॅशन डिझायनरने एका मुलाखतीत सांगितले आहे. 

ठळक मुद्देकोणत्या चित्रपटात हे कपडे वापरण्यात आले याचा उल्लेख देखील त्या कपड्यांच्या टॅगवर केला जातो. अनेकवेळा हे कपडे दुसऱ्या चित्रपटांच्या ज्युनिअर आर्टिस्टसाठी वापरले जातात.

चित्रपटात अतिशय महागडे कपडे नायक-नायिका घालत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर या कपड्यांचे काय होते हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल ना... चित्रीकरणानंतर या कपड्यांचे काय होते हे खुद्द एका फॅशन डिझायनरने एका मुलाखतीत सांगितले आहे. 

यशराज हे बॉलिवूडमधील सगळ्यात मोठ्या बॅनरपैकी एक बॅनर ओळखले जाते. यशराजची स्टायलिस्ट आयशा खन्नाने मिड डे शी बोलताना याविषयी सांगितले की, चित्रपटात वापरण्यात येणारे कपडे अनेकवेळा जपून ठेवले जातात. कोणत्या चित्रपटात हे कपडे वापरण्यात आले याचा उल्लेख देखील त्या कपड्यांच्या टॅगवर केला जातो. अनेकवेळा हे कपडे दुसऱ्या चित्रपटांच्या ज्युनिअर आर्टिस्टसाठी वापरले जातात. पण त्या ड्रेसमध्ये काही बदल करण्यात येतात. हे कपडे पूर्वी कोणत्या चित्रपटात वापरण्यात आलेले आहे हे लोकांच्या लक्षात येऊ नये याची काळजी घेतली जाते. पण सगळेच कपडे पुन्हा वापरले जातात असे नाही. काही कपडे फॅशन डिझायनर चित्रपटाची आठवण म्हणून स्वतःकडे ठेवतात.

कधी कधी या कपड्यांचा लिलाव करून त्यातून येणारे पैसे एखाद्या समाजसेवी संस्थेला देण्यात येतात. रोबोट या चित्रपटातील ऐश्वर्या राय आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या कपड्यांचा लिलाव करून त्यातून आलेले पैसे एका संस्थेला दान करण्यात आले होते तर बॉम्बे वेलव्हेट, देवदास यांसारख्या चित्रपटात वापरण्यात आलेले कपडे डिझायनरने केवळ या चित्रपटांसाठी कलाकारांना दिले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर डिझायनरला ते कपडे परत करण्यात आले. 

टॅग्स :बॉलिवूड