Watch Trailer : ‘इंदू सरकार’च्या ट्रेलरमध्ये दाखविला आणीबाणीचा काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 20:03 IST
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मधुर भंडारकर यांच्या आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाचे ट्रेलर काही वेळापूर्वीच लॉन्च करण्यात आले असून, चित्रपटातील प्रत्येक पात्र दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे.
Watch Trailer : ‘इंदू सरकार’च्या ट्रेलरमध्ये दाखविला आणीबाणीचा काळ!
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मधुर भंडारकर यांच्या आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाचे ट्रेलर काही वेळापूर्वीच लॉन्च करण्यात आले असून, चित्रपटातील प्रत्येक पात्र दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. १९७५ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित असलेल्या चित्रपटात तत्कालीन परिस्थितीचा घेतलेला आढावा उल्लेखनीय असल्याचे ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात आणीबाणी लागू केली होती, तेव्हा देशातील बºयाचशा लोकांनी यास विरोध केला होता. त्याचबरोबर अनेकजण या आदेशाविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्याचाच लढा ट्रेलरमधून बघावयास मिळत आहे. ‘अब इस देश में गांधी के मायने बदल चुके है, इमरजेंसी मे इमोशन नही मेरे आॅर्डर चलते है’ अशा दमदार डायलॉगने सुरु झालेल्या या ट्रेलरवरून एक सेंकदही नजर हटत नाही. कारण ट्रेलर बघितल्यानंतर एक गोष्ट निश्चितच मनात निर्माण होते, ती म्हणजे या चित्रपटातून पुन्हा एकदा मधुर भंडारकर इंडस्ट्रीवर आपली छाप सोडणार आहे. चित्रपटात सुप्रिया विनोद यांनी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली असून, त्यांचा लुक आणि संवाद यामध्ये बरेचसे साम्य दिसून येते, तर नील नितीन मुकेश संजय गांधींच्या भूमिकेत आहे. त्याचाही लुक बराचसा साम्य साधणारा आहे. ‘इंदू सरकार’ हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे. मधुर यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘चांदनी बार’, ‘हिरोइन’, ‘कॉर्पोरेट’, कॅलेंडर गर्ल’ यांसारख्या वेगळ्या धाटणींच्या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. आता पुन्हा एकदा ते ‘इंदू सरकार’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर एक वेगळा विषय घेऊन येत आहेत. चित्रपटातील विषय भारतातील सर्वांत मोठ्या घटनेवर आधारित असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. काही दिवसांपूर्वीच नील नितीन मुकेश यांनी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना टीजरही लवकरच रिलीज केला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार टीजर रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांमध्ये त्याविषयीची उत्सुकता दिसून येत आहे.