Join us  

'व्हॉईस ऑफ मुकेश' कमलेश अवस्थी काळाच्या पडद्याआड, 'जिंदगी इम्तिहान लेती है..' गाणं लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 8:54 AM

'व्हॉईस ऑफ मुकेश' या नावाने प्रसिद्ध असलेले गायक डॉ. कमलेश अवस्थी यांचं दुःखद निधन झालंय

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आलीय. 'व्हॉईस ऑफ मुकेश' म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गायक कमलेश अवस्थी यांचं निधन झालंय. २८ मार्चला अहमदाबाद येथील राहत्या घरात कमलेश यांनी अखेरचा श्वास घेतला. कमलेश यांनी 'नसीब' सिनेमात गायलेलं 'जिंदगी इम्तिहान लेती है' गाणं लोकप्रिय आहे. कमलेश यांच्या निधनाने संगीतविश्वातील एक तारा निखळला अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

डॉ.कमलेश अवस्थी यांनी आठ हिंदी चित्रपट आणि अनेक गुजराती चित्रपटात गाणी गायली. राज कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'गोपीचंद जासूस'मध्ये त्यांनी पार्श्वगायन केलं. राज कपूर यांनी कमलेश यांच्या गायनाचा आदर व्यक्त करत देशाला पुन्हा मुकेश परत मिळाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर कमलेश यांना 'व्हॉईस ऑफ मुकेश' म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. मुकेश यांनी अनेक गुजराती गाण्यांनाही आवाज दिला होता.

डॉ. कमलेश अवस्थी यांचा जन्म 1945 साली सावरकुंडला येथे झाला. त्यांनी भावनगर विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केले. कलागुरू भरभाई पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली भावनगर सप्तकला येथे त्यांनी संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. संगीत क्षेत्रात त्यांनी आपला पहिला म्युझिक अल्बम 'ट्रिब्युट टू मुकेश' रिलीज केला. कमलेश यांच्या निधनाने अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली देऊन शोक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :बॉलिवूडमुकेश