बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांनी काल मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून प्रत्येकालाच धक्का बसला. बॉलिवूडही शोकाकुल झाले. बॉलिवूडचे अनेक दिग्गज राजीव यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेत. यादरम्यान गर्दीतील एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, एक 94 वर्षांचे वृद्ध गृहस्थकाठीचा आधार घेत राजीव यांच्या घरी त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले. पांढरे केस, हातात काठी, तोंडावर काळ्या रंगाचे मास्क असे हे गृहस्थ काठी टेकवत टेकवत राजीव यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राजीव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेले हे गृहस्थ आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर या गृहस्थांचे नाव आहे विश्व मेहरा. कपूर कुटुंबासोबत विश्व मेहरा यांचे जवळचे ऋणानुबंध आहेत.विश्व मेहरा हे आर. के. स्टुडिओचे कधीकाळी मॅनेजर होते. इतकेच नाही तर अभिनेता अशीही त्यांची ओळख आहे. आवारा, जब जब फूल खिले आणि प्रेम ग्रंथ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. आणखी एक ओळख द्यायची झाल्यास ते नात्याने राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर यांचे मामा आहेत. याचमुळे बॉलिवूडमध्ये अनेक जण आजही त्यांना मामा म्हणून ओळखतात, बोलवतात.
विश्व मेहरा यांनी कपूर कुटुंबाच्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. कपूर कुटुंबाच्या सुखदु:खाचा साक्षीदार असलेले विश्व मेहरा यांचे राजीव यांच्यावर विशेष प्रेम होते. राजीव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून ते स्वत:ला रोखू शकले नाहीत. थरथरत्या हाताने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी राजीव यांना अखेरचा निरोप दिला.
2017 मध्ये आर के स्टुडिओला भीषण आग लागली होती. यानंतर कपूर कुटुंबाने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. 2019मध्ये गोदरेज समूहाने हा स्टुडिओ खरेदी केला.