Virat Kohli and Anushka Sharma Premanand Ji Maharaj: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काल (१२ मे) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती (Virat Kohli Retires From Test Cricket) घेतली. विराट कोहलीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. आता निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत वृंदावनला पोहचला आणि प्रसिद्ध कुंज आश्रमात प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराजांशी सुमारे १७ मिनिटे खाजगी चर्चाही केली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्काच्या हातात एक खास 'इलेक्ट्रॉनिक अंगठी' दिसून आली. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली व अनुष्का शर्मा हे प्रेमानंद महाराजांसमोर नतमस्तक होताना दिसून आले. महाराजांनी कोहलीला विचारले, "तू आनंदी आहेस का?", यावर कोहलीने स्मितहास्य करत "हो" असे उत्तर दिले. यावेळी अनुष्का आणि विराट हे महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकताना दिसले. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
यावेळी जेव्हा विराट हात जोडून बसला होता, तेव्हा त्याच्या हातात गुलाबी रंगाची अंगठी पाहायला मिळाली. तशीच अंगठी अनुष्काच्या हातातही होती. पण, अनुष्का ती अंगठी कॅमेऱ्यापासून लपवताना दिसली. या जोडीनं घातलेल्या या अंगठीचा काय उपयोग होतो, असा प्रश्न आता चाहत्यांना पडलाय. तर विराट आणि अनुष्काच्या हातात दिसणारी ही गुलाबी रंगाची अंगठी ही एक 'इलेक्ट्रॉनिक टॅली काउंटर रिंग' आहे. ही अंगठी देवाचे नामस्मरण करताना जप संख्या मोजण्यासाठी वापरली जाते. अशी रिंग वापरून जप किती वेळा केला, हे अचूकपणे मोजता येते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची संत प्रेमानंद महाराजांवर गाढ श्रद्धा आहे. प्रेमिनंद महाराजांच्या आश्रमात येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ते आले आहेत. जानेवारी 2023 मध्ये कुटुंबासह पहिल्यांदाच संत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भेट देण्यासाठी पोहचले होते. त्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी मुलगी वामिका आणि मलुगा अकाय यांनाही सोबत आणलं होतं. आताही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर या जोडीनं आध्यात्मिक शांतीसाठी साडेतीन तासांहून अधिक वेळ घालवला. दोघेही सकाळी सहाच्या सुमारास आश्रमात पोहोचले आणि साडेनऊच्या सुमारास तेथून निघाले.