Join us  

'शेरनी'मधील विद्या बालनचा लूक आला समोर, प्रेक्षकांच्या भेटीला येणार या दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:59 PM

अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील विद्याचा लूक समोर आला आहे. अमित मसुरकर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अबंडनतिया एंटरटेनमेंटने निर्मिती केली आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन असून शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

'शेरनी' या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

चित्रपटाचे निर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “२०२० मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर अबंडनतिया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे. विषयाला समर्पकत प्राप्त करून देण्यासाठी कायमच अमितची मार्गदर्शक भूमिका लाभली आहे.  व्यंगात्मक टिपण्णी ही त्याची शैली सिनेमाला अधिक रोचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे”

टी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले की, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी आनंदी आहे. विक्रम समवेत काम करणे कायमच आनंददायक असते. अबंडनतिया एंटरटेनमेंट’सोबत आणखी मनोरंजक व हटके कथांवर काम करण्यासाठी मी यापुढेही उत्सुक आहे”.विद्या बालनचा शेरनी चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :विद्या बालनभुषण कुमार