Join us  

विद्या बालन आगामी 'ह्या' सिनेमाबाबत आहे उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:41 PM

एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे.

ठळक मुद्देविद्याचा पहिला तेलगू सिनेमाविद्या दिसणार बसवाताराकम यांच्या भूमिकेतविद्याने गिरविले हार्मोनियमचे धडे

बॉलिवूडची उलाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री विद्या बालन तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विद्या पहिल्यांदा तेलगू सिनेमात काम करत असून तिचा या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूप चांगला असल्याचे तिने सांगितले. एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे.

विद्याने सांगितले की, दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाबाबत मी खूप उत्साही आहे. हा माझा पहिला तेलगू सिनेमा आहे. या चित्रपटाबाबत मी खूप उत्सुक आहे कारण मी कधीच इतर भाषेत संवाद बोलले नव्हते. मल्याळम चित्रपटात मी छोटा रोल केला होता. मात्र एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमधील माझी भूमिका मोठी आहे.एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरूवात करून फक्त पाचच दिवस झालेत. मात्र आतापर्यंतचा अनुभव अप्रतिम असल्याचे विद्याने सांगितले व पुढे म्हणाली की, या सिनेमाची टीम खूप चांगली आहे. या सिनेमाच्या कामाला सुरूवात बरोबर सकाळी नऊला होते आणि संध्याकाळी सहा वाजता संपते. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता.विद्या बालनने बसवाताराकम यांच्या भूमिकेसाठी हार्मोनियमचे धडे गिरविले आहेत. केवळ सहा दिवसात ती बेसिक हार्मोनियम शिकली. तिचे प्रशिक्षक व संगीतकार नितीन शंकर यांनी विद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. एनटीआर यांचा मुलगा नंदमुरी बालाकृष्णन चित्रपटात आपल्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. रवि किशन रामाराव यांच्या जवळच्या मित्राची भूमिका बजावताना दिसणार आहे. तसेच नंदमुरी बालाकृष्णन, विद्या बालन रवी किशन यांच्यासोबत बाहुबली फेम राणा दुग्गाबत्तीदेखील या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

टॅग्स :विद्या बालन