Join us  

या कारणामुळे विकी कौशलने फाडले होते त्याचे ऑफर लेटर

By प्राजक्ता चिटणीस | Published: February 21, 2020 6:00 AM

विकी कौशलने त्याला मिळालेले ऑफर लेटर का फाडले होते हे त्याने नुकतेच सांगितले.

ठळक मुद्देविकी सांगतो, मला अभिनयक्षेत्रातच करियर करायचे आहे असा विचार करून मी ऑफर लेटर फाडून टाकले.

विकी कौशलने आज मसान, राझी, संजू, उरीः द सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच हॉरर जॉनरकडे वळला आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

भूत पार्ट १- द हाँटेड शीप हा तुझा पहिला हॉरर चित्रपट आहे, एका वेगळ्या जॉनरच्या चित्रपटाची निवड करण्याचा विचार कसा केलास?मला या चित्रपटाविषयी विचारण्यात आल्यानंतर हा चित्रपट स्वीकारू की नाही असा प्रश्न मला सतावत होता. पण चित्रपटाची कथा वाचल्यानंतर निर्णय घ्यायचा असे मी ठरवले. मी कधीही स्क्रिप्ट वाचताना प्रेक्षकाच्या भूमिकेत असतो. त्यांना ही कथा आवडेल की नाही हा विचार करतो. मला दिवसा नव्हे तर रात्री स्क्रिप्ट वाचायला आवडतात. कारण त्यावेळी एकदम शांतता असते. मी भूत पार्ट १- द हाँटेड शीपची स्क्रिप्टदेखील रात्री वाचली होती. ही स्क्रिप्ट वाचताना मी या पटकथेत इतका गुंतलो होतो की, आता पुढे काय होणार याची क्षणोक्षणी मला उत्सुकता लागली होती. एवढेच नव्हे तर स्क्रिप्ट वाचल्यावर मी प्रचंड घाबरलो होतो. पाणी पिण्यासाठी उठून किचनमध्ये जाण्याची सुद्धा माझी हिंमत होत नव्हती. कथा वाचताना ती इतकी भयानक वाटते तर हा चित्रपट प्रेक्षकांना किती घाबरवेल हा विचार करूनच हा चित्रपट मी स्वीकारला.

हॉरर चित्रपटात काम करताना एक कलाकार म्हणून तुला अभिनय करताना त्यात काही बदल करावे लागले का?हॉरर चित्रपटात काम करणे आणि ॲक्शन, कॉमेडी, रोमँटिक चित्रपटात काम करणे यात खूपच फरक असतो. हॉरर चित्रपटात काम करताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, अभिनय हे सारखेच असले तरी टेक्निकली गोष्टी खूप बदलतात. कारण समोर भूत आहे असा विचार करून तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यायची असते. पण चित्रीकरण करताना तुमच्यासमोर काहीच नसते. त्यामुळे ते भूत किती भयानक आहे, ते कुठून कुठल्या दिशेने जाणार याची काहीच कल्पना नसते. तसेच एखादा आवाज ऐकून घाबरल्याचा अभिनय करायचा असतो. पण हा आवाज देखील कसा असणार काहीच माहिती नसते. या सगळ्यामुळे या चित्रपटात अभिनय करताना मी अनेक गोष्टी पहिल्यांदाच करत आहोत असे मला वाटले. पण या चित्रपटामुळे मला खूप काही शिकायला मिळाले असे मी नक्कीच सांगेन.

तू एक इंजिनिअर असूनसुद्धा अभिनयक्षेत्राकडे कसा वळलास?मी अनेक वर्षं रंगमंचावर अभिनय करत होतो. पण मी अभिनेताच बनेन असा कधी विचार देखील केला नव्हता. इंजिनिअर झाल्यानंतर माझ्याकडे नोकरीची ऑफर देखील आली होती. पण मला अभिनयक्षेत्रातच करियर करायचे आहे असा विचार करून मी ऑफर लेटर फाडून टाकले. या क्षेत्रात मला प्रचंड स्ट्रगल करावा लागला. पण मी हार मानली नाही. पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतली. तुम्ही चांगल्याप्रकारे काम करा... तुमच्यासाठी देवाने नेहमीच काही ना काही तरी चांगला बेत आखलेला असतो. केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा... असे मानणारा मी आहे आणि आज मला माझ्या मेहनतीचे फळ मिळत देखील आहे. मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अपयशांचा सामना करावा लागला. पण अपयश आणि यश या दोन्ही गोष्टींना आनंदाने सामोरे जायचे असे माझ्या वडिलांना मला नेहमीच शिकवले आहे. 

भूत पार्ट १- द हाँटेड शीपच्या ट्रेलरला प्रेक्षकांच्या खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे, त्याबद्दल काय सांगशील?भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. हॉरर जॉनरला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याने मी प्रचंड खूश आहे. ट्रेलर लाँच झाल्यानंतर त्यावर मीम्स देखील बनवण्यात आले आहेत. मला हे मीम्स खूप आवडले आहेत. धर्मा प्रोडक्शनने एक वेगळा जॉनर प्रेक्षकांच्या भेटीस आणला असून तो प्रेक्षकांना आवडत आहे याचा मला आनंद होत आहे.

टॅग्स :विकी कौशलभूत चित्रपट