Join us  

एकाकी जीवन जगतोय हा सुपरस्टार, उपचारासाठी देखील नाहीयेत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 6:03 PM

या अभिनेत्याने ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून दिलीप कुमार, धर्मेंद्र, देव आनंद यांसारख्या अनेक दिग्गजांसोबत ते चित्रपटांमध्ये झळकले आहेत.

ठळक मुद्देअनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर सतिश यांनी एका वाहिनीद्वारे लोकांना अभिनयाचे धडे द्यायला सुरुवात केली. सगळे काही सुरळीत सुरू असताना २०१४ मध्ये ते बाथरूममध्ये पडले आणि त्यांना दुखापत झाली.

अनेक हिंदी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारलेल्या एका कलाकाराची सध्या अतिशय वाईट परिस्थिती आहे. या कलाकाराने हिंदी सोबतच पंजाबी चित्रपटात काम केले असून त्याला पंजाबी चित्रपटांचा अमिताभ बच्चन असे म्हटले जात असे. या अभिनेत्यांचे नाव सतीश कौल असून दिलीप कुमार आणि नूतन यांच्या कर्मा या प्रसिद्ध चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

सतिश कौल यांनी आजवर ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून दिलीप कुमार, धर्मेंद्र, देव आनंद यांसारख्या अनेक दिग्गजांसोबत ते चित्रपटांमध्ये झळकले आहेत. पण आज त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असून त्यांना सांभाळायला देखील कोणीही तयार नाहीये. बॉलिवूडमधील त्यांचा काळ आठवला तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येते. आधाराशिवाय त्यांना धड चालता देखील येत नाही. त्यांना या परिस्थितीत कोणीतरी मदत करावी यासाठी ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.

सतिश कौल यांचा जन्म ८ सप्टेंबर १९५४ ला काश्मीरमध्ये झाला. त्यांचे वडील हे प्रसिद्ध शायर होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. तिथे त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. जया बच्च, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी डेंझोम्पा यांसारखे दिग्गज कलाकार त्यांच्या वर्गात होते. त्यांनी इथूनच त्यांच्या बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी जवळजवळ ३० वर्षं चित्रपटांमध्ये काम केले. १९७३ ला सतिश कौल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काहीच वर्षांत त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीच्या कुटुंबातील सगळे अमेरिकेत राहात होते. त्यामुळे आपण देखील अमेरिकेला कायमचे जावे असे त्यांचे म्हणणे होते. पण काही केल्या सतिश आपले अभिनय करियर सोडायला तयार नव्हते आणि त्याचमुळे त्यांच्या पत्नीत आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते एकटे राहायला लागले.

अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर सतिश यांनी एका वाहिनीद्वारे लोकांना अभिनयाचे धडे द्यायला सुरुवात केली. सगळे काही सुरळीत सुरू असताना २०१४ मध्ये ते बाथरूममध्ये पडले आणि त्यांना दुखापत झाली. त्यांनी यावर मुंबईत उपचार घेतले. ते जवळजवळ दीड वर्षं अंथरुणाला खिळून होते. त्यानंतर काही महिने पटियाला येथील रुग्णायलात त्यांना दाखल करण्यात आले होते. या सगळ्यात त्यांनी कमावलेले सगळे पैसे संपले. त्यामुळे त्यांना ११  हजार रुपये पेशन्स देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला. त्यांना मिळणाऱ्या पैशांतून त्यांनी अॅक्टिंग स्कूल सुरू केले. पण त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते वृद्धाश्रमात राहायला लागले. त्यांची परिस्थिती कळल्यानंतर त्यांच्या एका फॅनने त्यांना घरी नेले. आता तर सरकारकडून मिळणारे त्यांचे पेन्शन देखील बंद झाले आहे. सतिश यांनी अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात काम केल्यामुळे या क्षेत्रातील कोणीतरी त्यांना मदत करावी असे त्यांचे म्हणणे आहे. ते सध्या लुधियानामध्ये राहात आहेत.

टॅग्स :नुतनदिलीप कुमारदेव आनंदधमेंद्र