Join us  

"सुश्मिताने मला मिस युनिव्हर्सचा ताज परत करायला सांगितलं", उर्वशी रौतेलाचे अभिनेत्रीवर आरोप, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 10:52 AM

सुश्मिताने उर्वशी रौतेलाला परत करायला लावला 'मिस युनिव्हर्स'चा ताज! अभिनेत्रीचा मोठा खुलासा

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला. अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकलेली उर्वशी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते. उर्वशीने 'मिस एशियन सुपर मॉडेल', 'मिस टुरिजम क्वीन ऑफ द इयर', 'मिस दिवा युनिव्हर्स' असे अनेक खिताब नावावर केले आहेत. २०१५ साली उर्वशीने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. पण, याआधी तिने २०१२ सालीदेखील 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत भाग घेतल्याचा खुलासा केला आहे. याबरोबरच तिने 'मिस युनिव्हर्स' असलेल्या सुश्मिता सेनवरही गंभीर आरोप केले आहेत. 

उर्वशीने मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं. सुश्मिता सेनने उर्वशीला स्पर्धेतून बाहेर जाण्यास सांगितलं होतं, असा खुलासा उर्वशीने केला आहे. मिस युनिव्हर्स २०१२ वेळी फेमिना मिस इंडियाने काढता पाय घेतला होता. त्यामुळे सुश्मिता सेनच्या कंपनीकडून भारतातील स्पर्धक निवडले गेले होते. डोनाल्ड ट्रम्प मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन करायचे. पण, तेव्हा मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकूनही तो मुकुट सुश्मिताने परत करण्यास सांगितल्याचं उर्वशी म्हणाली.

उर्वशी म्हणाली, "मी मिस युनिव्हर्स २०१२ चा खिताब जिंकला होता. पण, तेव्हा वयाची अट होती. डोनाल्ड ट्रम्प आमचे बॉस होते. तेव्हा १८ वर्ष ही वयाची अट होती. पण, जेव्हा मी स्पर्धा जिंकले तेव्हा मी १७ वर्षांची होते. १८ वर्षांची होण्याकरिता मी २४ दिवसांनी लहान होते. हे मला देखील माहीत नव्हतं." यामुळे सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा ताज परत देण्यास सांगितल्याचा खुलासाही उर्वशीने पुढे केला. "सुश्मिताने मला सांगितलं की उर्वशी तू नाही जाऊ शकत..तेव्हा मला हरल्याचं फिलिंग येत होतं", असंही उर्वशीने सांगितलं. मिस युनिव्हर्सनंतर उर्वशी सिनेमात पदार्पण करणार होती. 

उर्वशीने त्यानंतर २०१५ साली पुन्हा मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा उर्वशी स्पर्धक नसून परिक्षक असल्याचं इतर मॉडेलला वाटलं होतं, असंही तिने सांगितलं. मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेण्यासाठी सिनेमा नाकारल्याचंही उर्वशी म्हणाली. "लोक म्हणतात की १२वी पास झाल्यानंतर १०वीची परिक्षा कोण देतं? पण, मी तरीही हे केलं. दोनदा मिस युनिव्हर्स इंडियाचा खिताब जिंकणारी मी एकमेव मुलगी आहे," असंदेखील ती म्हणाली.

टॅग्स :उर्वशी रौतेलासुश्मिता सेनमिस युनिव्हर्स