ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचा पेशावरमधील बंगला खचला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 19:18 IST
बॉलिवूडचे सुपरस्टार ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचा पाकिस्तानातील पेशावर येथे तब्बल शंभर वर्षांपेक्षाही जुना बंगला आहे. मात्र आता आलेल्या वृत्तानुसार ...
ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचा पेशावरमधील बंगला खचला!
बॉलिवूडचे सुपरस्टार ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचा पाकिस्तानातील पेशावर येथे तब्बल शंभर वर्षांपेक्षाही जुना बंगला आहे. मात्र आता आलेल्या वृत्तानुसार या बंगल्याची पूर्णत: दुर्दशा झाली असून, बंगल्याचा बराचसा भाग खचला आहे. वास्तविक हा बंगला खूप वर्षांपासून धोकादायक स्थितीत होता. सांस्कृतिक वास्तू परिषदेचे महासचिव शकील वहीदुल्ला यांनी सांगितले की, किस्सा ख्वानी बाजार या ऐतिहासिक परिसरात असलेल्या या बंगल्याचा फक्त बाहेरील भाग आणि दरवाजेच शाबूत आहेत. बाकी आतील सर्व भाग पूर्णत: खचला आहे. २०१४ मध्ये पुरातत्त्व विभागाने दिलीपकुमार यांचा हा बंगला राष्ट्रीय वास्तू म्हणून घोषित केला होता. सुपरस्टार दिलीपकुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ मध्ये पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता. आता त्यांचे वय ९४ वर्षे इतके आहे. दिलीपकुमार यांचे वडील १९३० मध्ये पेशावर सोडून मुंबईत आपल्या परिवारासह स्थायिक झाले होते. पुढे दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांना बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ या नावानेही ओळखले जाते. दिलीपकुमार यांना आतापर्यंत तब्बल आठवेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त १९९८ मध्ये दिलीपकुमार यांना पाकिस्तानातील सर्वोच्च नागरिक सन्मानानेही गौरविण्यात आले. यावेळी त्यांना ‘निशान-ए-इम्तियाज’ हा किताब देण्यात आला. तसेच भारतात त्यांचा दादासाहेब फाळके या सर्वोच्च सन्मानानेही गौरव करण्यात आला. दिलीपकुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५५ मध्ये आलेल्या ‘देवदास’ आणि १९६० मधील ‘मुगल-ए-आजम’ या दोन चित्रपटांनी त्यांच्या करिअरला एक वेगळीच दिशा दिली होती. ‘मुगल-ए-आजम’मध्ये त्यांनी मुगल राजकुमार जहांगीर याची भूमिका साकारली होती. दिलीपकुमार यांचे बॉलिवूडमधील योगदान प्रचंड असून, प्रेक्षक त्यांचे चित्रपट आजही तेवढ्याच आतुरतेने बघतात. दिलीपकुमार यांची अभिनयाची एक वेगळीच शैली होती. प्रेक्षकांना हीच शैली प्रचंड भावत असे. त्यामुळेच आज ते बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत.