‘कहानी’ सिरीजचा तिसरा भाग येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 21:39 IST
सुजॉय घोष दिग्दर्शित व विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कहानी’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘कहानी २ दुर्गा राणी ...
‘कहानी’ सिरीजचा तिसरा भाग येणार
सुजॉय घोष दिग्दर्शित व विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कहानी’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘कहानी २ दुर्गा राणी सिंग’ हा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. आता या चित्रपटाला फ्रेंचायसीमध्ये रुपांतरित करण्याचा विचार निर्माते करीत असून कहानी ३ची लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे निर्माता जयंतीलाल गाडा यांनी सांगितले. कहानी या चित्रपटाविषयी एका वृत्तपत्राशी गाडा यांनी चर्चा केली. जयंतीलाल गाडा म्हणाले, मी नुकताच सुजॉयला भेटलो आहे. तो स्क्रिप्टवर काम करीत आहे. अर्थातच यातही आधीच्या दोन भागापेक्षा काहीतरी वेगळे असेल. मात्र यात आधीच्या दोन भागाप्रमाणे थ्रिलर कायम राहणार आहे. यात कहानी मधील कलाकाराच कायम राहतील का? असे विचारल्यावर गाडा म्हणाले, आधी या चित्रपटाची पटकथा पूर्णत: तयार होऊ द्या. एकदा पटकथा फायनल झाली की कलाकारांची निवड करणे आमच्यासाठी देखील सोपे होईल. कलाकारांची निवड स्क्रिप्टनुसार झाल्यास तो चित्रपट अधिक चांगला होतो असे त्यांनी सुचविले. जयंतीलाल गाडा यांनी २०१२ साली कहानी या चित्रपटाची निर्मिती केली होती. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन हिची प्रमुख भूमिका होती. अखेरपर्यंत ट्विस्ट व थ्रिलर कायम ठेवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. यानंतर यावर्षी कहानी या चित्रपटाचा दुसरा भाग ‘कहानी २ दुर्गा राणी सिंग’ प्रदर्शित करण्यात आला. यातही विद्या बालन हिची प्रमुख भूमिका होती तर अभिनेता अर्जुन रामपाल याने या चित्रपटात पोलीस अधिकाºयाची महत्त्वाची भूमिका केली होती. या चित्रपटाला देखील बॉक्स आॅफिसवर चांगलेच यश मिळाले आहे.