Join us  

जावेद अख्तर यांना पटला नाही पीएम- नरेंद्र मोदी टीमचा खुलासा, जाणून घ्या काय म्हणाले ते...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 4:55 PM

‘पीएम- नरेंद्र मोदी’  या चित्रपटाचे निर्माते संदीप एससिंग यांनी ट्वीट करून खुलासा केला होता की, आम्ही या चित्रपटात 1947ः अर्थ या चित्रपटातील ईश्वर अल्ला आणि दस या चित्रपटातील सुनो गौर से हे गाणे घेतले आहे. त्याचमुळे या गाण्याचे गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांची नावे या पोस्टरमध्ये टाकण्यात आली आहेत. 

ठळक मुद्देमाझे नाव टाकण्यामागे त्यांचा हेतू चांगला असता तर त्यांनी असे केले असते. पण त्यांचा उद्देश काही तरी वेगळाच होता. बॉलिवूडमध्ये अशाप्रकारची घटना कधीच घडली नाही. सध्या अनेक चित्रपटात जुनी गाणी वापरली जातात. पण कोणत्याही संगीतकाराचे नाव पोस्टरवर टाकले जात नाही

‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे पोस्टर पाहून गीतकार जावेद अख्तर यांना चांगलाच धक्का बसला होता. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चित्रपटाशी निगडित असलेल्या सगळ्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. या नावात जावेद अख्तर यांचे देखील नाव होते. या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी त्यासोबत लिहिले होते की, या पोस्टरवर माझे नाव पाहून मला धक्काच बसला... कारण या चित्रपटातील कोणतीच गाणी मी लिहिलेली नाहीत. 

 

जावेद अख्तर यांनी हे ट्वीट केल्यानंतर ‘पीएम- नरेंद्र मोदी’  या चित्रपटाचे निर्माते संदीप एससिंग यांनी ट्वीट करून याबाबत खुलासा केला होता की, आम्ही या चित्रपटात 1947ः अर्थ या चित्रपटातील ईश्वर अल्ला आणि दस या चित्रपटातील सुनो गौर से हे गाणे घेतले आहे. त्याचमुळे या गाण्याचे गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांची नावे या पोस्टरमध्ये टाकण्यात आली आहेत. 

‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या टीमने दिलेला हा खुलासा जावेद अख्तर यांना पटलेला नाही. मुंबई मिररशी बोलताना त्यांनी सांगितले की, संदीप एससिंग कोण आहे हे मला माहीत देखील नाही. तसेच जुन्या चित्रपटातील गाणे एखाद्या चित्रपटात घेतल्यानंतर प्रमोशनल गोष्टीत मुख्य चित्रपटातील व्यक्तींचा उल्लेख कधीच केला जात नाही. मी चित्रपटातील कोणतेच गाणे लिहिले नसले तरीही मी या चित्रपटाचा भाग आहे असे लोकांना दर्शवणे खूपच चुकीचे आहे. कोणत्या चित्रपटातून गाणी घेण्यात आली आहेत हे तुम्ही  चित्रपटाच्या क्रेडिट लाईनमध्ये टाकू शकता. तसेच त्यांना माझ्याबद्दल आदर असल्याने माझे नाव त्यात टाकायचेच होते तर या दोन्ही गाण्याचे संगीतकार शंकर एहसान लॉय आणि ए. आर. रहमान यांची नावे का पोस्टरमध्ये टाकण्यात आली नाहीत. ‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये माझे नाव वापरायच्या आधी मला कोणी कल्पना देखील दिली नाही. त्यांनी हे गाणे म्युझिक कंपनीकडून घेतले असेल तर त्यांनी पोस्टरवर माझ्या नावासोबत चित्रपटाचे नाव, संगीतकाराचे नाव देणे अपेक्षित होते. माझे नाव टाकण्यामागे त्यांचा हेतू चांगला असता तर त्यांनी असे केले असते. पण त्यांचा उद्देश काही तरी वेगळाच होता. बॉलिवूडमध्ये अशाप्रकारची घटना कधीच घडली नाही. सध्या अनेक चित्रपटात जुनी गाणी वापरली जातात. पण कोणत्याही संगीतकाराचे नाव पोस्टरवर टाकले जात नाही. 

जावेद अख्तर यांची पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य करण्यात आले हे स्पष्टच आहे. जावेद अख्तर यांनी ‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत हेच लोकांना दर्शवण्यासाठी त्यांचे नाव वापरण्यात आले आहे. 

 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीजावेद अख्तरशबाना आझमी