Join us  

'द आर्चीज' सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचलं बच्चन कुटुंबीय, अभिनेत्री रेखाच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 11:49 AM

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'द आर्चीज' सिनेमातून पदार्पण करत आहे.

बॉलिवूड कलाकारांपेक्षा सध्या स्टारकिड्स जास्त चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' (The Archies) सिनेमा. या सिनेमात शाहरुख खानची लाडकी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची लेक खुशी कपूर हे स्टारकिड्स मुख्य भूमिकेत आहेत. कालच सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. स्क्रीनिंगला अमिताभ बच्चन, शाहरुख खान आपल्या संपूर्ण कुटुंबासह हजर होते. दरम्यान अभिनेत्री रेखाही (Rekha) स्क्रीनिंगला पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

'द आर्चीज' च्या स्क्रीनिंगला काल अख्खं बॉलिवूड अवतरलं होतं. छोट्या मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. बच्चन कुटुंबातून अमिताभ बच्चन, जया, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या,श्वेता, निखिल नंदा, नव्या नवेली असे सर्वच अगस्त्यला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. तर सुहाना खानसोबत शाहरुख, गौरी, आर्यन आणि अबराम असं अख्खं कुटुंब आलं होतं. शिवाय कतरिना कैफ, जावेद अख्तर, रणवीर सिंह, रणबीर कपूर, नीतू कपूर, मलायका अरोरा, अनन्या पांडे, अर्जुन कपूरसह अनेक कलाकार दिसले. 

दरम्यान अभिनेत्री रेखा यांच्या एन्ट्रीनंतर सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. हिरवी रेशम साडी, मोकळे केस, सिंदूर अशा टिपीकल लूकमध्ये रेखा यांनी एन्ट्री घेतली. त्यांच्या उपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. बच्चन कुटुंबीयांच्या या खास दिवशी रेखाच्या हजेरीची सगळीकडेच चर्चा झाली.

अभिनेत्री रेखा अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहेत. मात्र त्या प्रत्येक इव्हेंट, पार्टी, स्क्रीनिंग आणि अवॉर्ड सोहळ्याला आवर्जुन हजेरी लावतात. 

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमा