Join us  

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विवेक यांचे निधन, फॅन्सना बसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 10:43 AM

विवेक यांना शुक्रवारी वडापलानी येथील सीम्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विवेक यांनी गुरुवारी कोरोनाची लस घेतली होती.

ठळक मुद्देतामीळनाडूमधील कोवीलपट्टीमध्ये विवेक यांचा जन्म झाला होता. त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्यांच्या करियरला सुरुवात केली.

तामीळ इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक यांचे आज सकाळी निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. विवेक यांना शुक्रवारी वडापलानी येथील सीम्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली. पण या शस्रक्रियेनंतर त्यांची तब्येत प्रचंड खालवली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण सकाळी 4.35 ला त्यांची प्राणज्योत मालवली.

शुक्रवारी बेशुद्धावस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना त्रास होत असल्याने पत्नी आणि मुलीने रुग्णालयात दाखल केले होते. 

विवेक यांनी गुरुवारी कोरोनाची लस घेतली होती. पण त्यांच्या मृत्यूचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. डॉ. राजू सीवास्मी यांनी सांगितले की, हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची तब्येत खालवली. त्यांनी गुरूवारी घेतलेल्या कोरोनाच्या लसीचा त्यांच्या निधनाशी काहीही संबंध नाहीये. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात आल्यावर त्यांच्या सगळ्या टेस्ट करण्यात आलेल्या होत्या. त्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती.

तामीळनाडूमधील कोवीलपट्टीमध्ये विवेक यांचा जन्म झाला होता. त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्यांच्या करियरला सुरुवात केली. के भालचंद्र यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रभावित होऊन मनाथील उरुडी वेंडम या चित्रपटात के भालचंद्र यांनी विवेक यांना छोटीशी भूमिका साकारण्याची संधी दिली. 

त्यानंतर पुथू पुथू अर्थंगल या चित्रपटात एक कॉमिक अभिनेते म्हणून विवेक झळकले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट देत प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. 2009 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

विवेक यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या मुलाचे काही वर्षांपूर्वी डेंग्यूने निधन झाले. विवेक यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या फॅन्सना त्यांच्या निधनामुळे धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. 

टॅग्स :चेन्नई