Join us  

तब्बूने उलगडले अंधाधुनच्या शेवटाचे रहस्य, म्हणाली माझ्यामते तरी असा आहे शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 5:02 PM

अंधाधुन या चित्रपटाचा शेवट अतिशय गुढ असल्याने हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाच्या शेवटाबाबत आपले अंदाज लावले होते.

ठळक मुद्देमला विचाराल तर सिमीचे (तब्बूने साकारलेली व्यक्तिरेखा) निधन झाले आणि आयुषमान चित्रपटाच्या शेवटी खरंच आंधळा बनतो असे तरी मला वाटते. पण तो आपल्याला जे काही सांगतो ते खरं आहे की खोटं ते आपल्याला माहीत नाही. 

आयुषमान खुराणा आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला अंधाधुन हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा, या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटातील तब्बू आणि आयुषमान यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. 

अंधाधुन या चित्रपटाचा शेवट अतिशय गुढ असल्याने हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाच्या शेवटाबाबत आपले अंदाज लावले होते. आता या चित्रपटाचा खरा शेवट काय आहे याविषयी खुद्द तब्बूने आता सांगितले आहे.

अंधाधुन या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये झाले. यावेळी खुद्द तब्बू तिथे उपस्थित होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता कित्येक महिने झाले असले तरी आजही प्रेक्षक या चित्रपटाची चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचा शेवट खरा काय होता याविषयी आजही प्रेक्षकांकडून तर्क वितर्क लावले जातात. तब्बूने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, खरे तर या चित्रपटाचा शेवट काय आहे हे लोकांना चित्रपटात उलगडून दाखवायला मला अधिक आवडले असते. पण हा शेवट काय आहे हे उलगडून दाखवू नये असे दिग्दर्शकाचे म्हणणे होते. चित्रपटाच्या शेवटी खरे काय होते हे आपण लोकांना दाखवूया असे मी सांगितले होते. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीराम माझ्या या मताशी सहमत नव्हता. लोकांनी त्यांच्यापद्धतीने चित्रपटाचा शेवट काय आहे हे समजून घ्यावे असे त्याचे म्हणणे होते.

तब्बूने पुढे म्हटले की, तुम्ही जसा विचार करता, तसाच तो पडद्यावर शेवट तुम्हाला दिसतो. मला विचाराल तर सिमीचे (तब्बूने साकारलेली व्यक्तिरेखा) निधन झाले आणि आयुषमान चित्रपटाच्या शेवटी खरंच आंधळा बनतो असे तरी मला वाटते. पण तो आपल्याला जे काही सांगतो ते खरं आहे की खोटं ते आपल्याला माहीत नाही. 

टॅग्स :तब्बूअंधाधुन