Join us  

हाथरस केसवरून स्वरा भास्कर संतापली, योगी आदित्यनाथांच्या राजीनाम्याची केली मागणी

By अमित इंगोले | Published: September 30, 2020 11:43 AM

कॉंग्रेस नेता प्रियंका गांधी यांच्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात गॅगरेपची शिकार झालेल्या तरूणीने शेवटचा श्वास घेतला. या घटनेवरून देशभरातून लोक राग व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त करत आहेत. अशात कॉंग्रेस नेता प्रियंका गांधी यांच्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करनेहीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

स्वरा भास्करने ट्विटमध्ये लिहिले की, 'आता वेळ आली आहे की, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या राज्यात कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहे. त्यांच्या पॉलिसीजने जातीवरून भांडणे सुरू आहेत. खोटे एनकाऊंटर्स होत आहेत, गॅंगवॉर होत आहे आणि उत्तर प्रदेशमध्य बलात्काराची महामारी पसरली आहे. हाथरस केस हे केवळ एक उदाहरण आहे'.

दरम्यान, याआधी स्वरा भास्करने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही निशाणा साधला. स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात पायल घोष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वकिल नितीन सातपुते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे एकत्र दिसत आहेत. या फोटोसोबत स्वराने लिहिले की, 'जर मंत्री आठवले यांनी हेच समर्थन हाथरसमधील बलात्कार पीडितेला आणि तिच्या परिवाराला दिलं असतं तर चांगलं झालं असतं'.

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :हाथरस सामूहिक बलात्कारस्वरा भास्करयोगी आदित्यनाथउत्तर प्रदेश