Join us  

निवडणूक जिंकताच सनी देओल झालेत ट्रोल! लोकांनी म्हटले, ‘गुरदासपूर भी आ जाओ’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 10:29 AM

भाजपाच्या तिकिटावर गुरुदासपूर येथून निवडणूक लढवून सनी देओल लोकसभेत पोहोचले. पण सध्या याच कारणाने त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आलीय.

ठळक मुद्देसनी देओल यांच्या सिनेमांमधून ही प्रखर राष्ट्रवादाची भावना दिसते. सनी देओल यांची ही प्रतिमा त्यांच्या विजयाचे कारण ठरली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी प्रतिस्पर्ध्याला नमवत आपली राजकीय इनिंग सुरु केली. अभिनेते सनी देओल त्यापैकीच एक. भाजपाच्या तिकिटावर गुरुदासपूर येथून निवडणूक लढवून सनी देओल लोकसभेत पोहोचले. पण सध्या याच कारणाने त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आलीय. होय, सनी देओल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘सध्या मी काजा (हिमाचल प्रदेश)च्या रस्त्यावर आहे. हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. मागच्या वर्षीही मी येथे आलो होता. चांगले लोक आणि उत्तम जेवण. मी अर्धा तास इथेच थांबणार. येथे येऊन खूप चांगले वाटले,’ असे या व्हिडीओत ते सांगत आहेत. सनी देओल यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आणि ते ट्रोल झालेत. त्यांना असे सुट्टी एन्जॉय करताना पाहून सोशल मीडिया युजर्सनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले.

‘जणू गुरूदासपूरमधील सगळ्या समस्या संपल्या आहेत. कदाचित म्हणून तुम्ही सुट्टीच्या मूडमध्ये आहात,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरनेही सनी देओल यांना लक्ष्य केले. ‘गुरदासपूर भी आ जाओ,’ असे त्याने लिहिले.

अन्य एका युजरने सेलिब्रिटी लोकप्रतिनिधींना यानिमित्ताने लक्ष्य केले. ‘अनेक स्टार लोकप्रतिनिधी मतदारसंघाकडे फिरकतही नाहीत,’ असे या युजरने म्हटले. ‘गुरूदासपूरचा स्टार, सुट्टीच्या मूडमध्ये...आता व्हिडीओ आणि सिनेमे....सगळे काही चांगले असेल, अशी आशा करूयात,’ असे अन्य एकाने लिहिले. पंजाबमधील गुरुदासपूरमधून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या जागी भाजपने अभिनेता सनी देओल यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवले होते. पुलवामा हल्ल्यानंतर, बालाकोट एअरस्ट्राइक झाल्यानंतर भाजपने राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे वातावरण पाहात सनी देओल यांना उमेदवारी दिली होती. सनी देओल यांच्या सिनेमांमधून ही प्रखर राष्ट्रवादाची भावना दिसते. त्यामुळे सनी देओल यांची ही प्रतिमा त्यांच्या विजयाचे कारण ठरली.

टॅग्स :सनी देओल