Suniel Shetty On Kartik Aaryan In Hera Pheri 3: 'हेरा फेरी ३' या सिनेमाची सध्या चर्चा सुरू झाली. गेल्या जानेवारी महिन्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे एकत्र दिसल्यानंतर सिनेमा लवकरच भेटीला येणार, म्हणून चाहते खुश झाले होते. पण आता परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला आहे. परेश यांनी त्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. तर करार मोडून सिनेमा अचानक सोडल्यानं निर्माता अक्षय कुमारनं कायदेशीर नोटीस पाठवली असून २५ कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. या सर्व वादात आता नवीन अपडेट समोर येत आहे. सुनील शेट्टीनं सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यनची एन्ट्रीवर भाष्य केलंय.
सुनील शेट्टीने अलीकडेच ‘झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीत'हेरा फेरी ३' विषयी अनेक महत्त्वाचे खुलासे केले. कार्तिक आर्यन 'हेरा फेरी ३' मध्ये दिसणार की नाही, याबाबत सुनीलने थेट दुजोरा दिला नाही. तरीदेखील, तो कोणाचंही रिप्लेसमेंट नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. तो म्हणाला, "राजूच्या भूमिकेत कार्तिक आर्यनची एन्ट्री कधीच होणार नव्हती. एक नवीन आणि फ्रेश कॅरेक्टर कार्तिकचं होतं. जसं 'शोले'मधील जय-वीरू किंवा बसंती-धन्नो यांना कोणीच रिप्लेस करू शकत नाही, तसंच 'हेरा फेरी'च्या मुख्य पात्रांनाही कोणीही रिप्लेस करू शकत नाही".
'हेरा फेरी' ही सुपरहिट फ्रँचायझी आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हेरा फेरी' २००० साली आला होता. तर २००६ साली 'फिर हेरा फेरी' आला. तर आता १९ वर्षांनी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्याचा भागाची घोषणा करण्यात आली. बाबूराव, श्याम आणि राजू या तिघांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप आतुर होते. मात्र आता परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.