Join us  

ते शब्द जिव्हारी लागले अन् बालसुब्रमण्यम झाडाखाली बसून ढसाढसा रडले...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 4:48 PM

स्वत: बालसुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

ठळक मुद्देविविध 16 भाषेतील सुमारे 40 हजार गाणी त्यांनी गायली. हेच बालसुब्रमण्यम एकेकाळी अपमान सहन न झाल्याने ढसाढसा रडले होते.

‘सुरांचा बादशाह’, ‘आवाजाचा जादूगार’ एसपी बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी गायलेली एकापेक्षा एक सरस गाणी आजही कानात रूंजी घालतात.1966 मध्ये त्यांना ‘श्री श्री श्री मर्यादा रमन्ना’  या चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.  विविध 16 भाषेतील सुमारे 40 हजार गाणी त्यांनी गायली. हेच बालसुब्रमण्यम एकेकाळी अपमान सहन न झाल्याने ढसाढसा रडले होते.स्वत: बालसुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

तर हा किस्सा होता संगीत दिग्दर्शक चेल्लापिला सत्यम यांच्यासोबतच्या एका गाण्याचा.  चेल्लापिला सत्यम यांना बालसुब्रमण्यम गुरु मानत. 1968 मध्ये बालसुब्रमण्यम यांची सत्यम यांच्यासोबत पहिले गाणे गायले होते. ते होते, ‘पलामनसुलु’ या तेलगू सिनेमातील ‘अप्पेलेनी थोपामये’. गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु झाले. पण बालसुब्रमण्यम काही केल्या सत्यम यांच्या अपेक्षेनुसार गात नव्हते. अखेर एकाक्षणी सत्यम प्रचंड संतापले आणि बालसुब्रमण्यम यांच्यावर अक्षरश: ओरडू लागले. इंडस्ट्रीत असे कसे लोक येत आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे ते शब्द बालसुब्रमण्यम यांच्या इतके जिव्हारी लागले की, ते थेट जवळच्या एका बागेत गेले. त्यांना अपमान सहन झाला नाही आणि बागेत एका झाडाखाली बसून रडू लागले. काही वेळानंतर चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर अटलुरी पूर्णचंद्र राव आणि प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह वाय. व्ही. राव यांनी बालसुब्रमण्यम यांना समजावले आणि सत्यम यांच्याकडे घेऊन गेले़ बालू नवीन आहे. तुम्ही त्यांच्यासोबत असे वागायला नको, असे त्यांनी सत्यम यांनाही समजावले.  पुन्हा एकदा रेकॉर्डिंग सुरू झाले. त्यानंतर बालसुब्रमण्यम असे काही गायले की सत्यम खुश झालेत. पुढे  सत्यम गुरू यांनी बालसुब्रमण्यम यांना स्वत:चा मुलगा मानले होते. पुढे त्यांनी कधीच बालसुब्रमण्यम यांच्याशिवाय गाणी रेकॉर्ड केली नाहीत.

ते स्वप्न राहिले अधुरे़...बालसुब्रमण्यम नेहमी मोहम्मद रफी यांच्या गाण्याचे खूप मोठे चाहते होते. त्यांना त्यांच्यासोबत एखाद्या चित्रपटात गाणेही गायचे होते, परंतु त्यांना संधीच मिळाली नाही. रफीसोबत गायची संधी मिळाली नाही, याची खंत त्यांना शेवटपर्यंत होती. बालसुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. एकदा रफी साहेब एका तेलुगू चित्रपटाच्या रेकॉर्डिंगसाठी आले होते, त्यावेळी बालसुब्रमण्यम यांची त्यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी सराव सुरू असल्यामुळे बालसुब्रमण्यम त्यांच्या पायांना स्पर्श करून आले होते.  

टॅग्स :बॉलिवूड