Join us

साऊथ सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 13:26 IST

Kaikala Satyanarayana Passed Away : साऊथ सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे २३ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतून दुःखद बातमी समोर येत आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचे २३ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी  सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते स्वास्थ्याच्या समस्यांशी सामना करत होते. सत्यनारायण यांच्या निधनामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर उद्या २४ डिसेंबर रोजी महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रसिद्ध निर्माते वामसी शेखर यांनी ट्विटरवर कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी दिली. ट्विटमध्ये लिहिले की, दिग्गज अभिनेते कैकला सत्यनारायण गारू यांचे निधन. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

कैकला सत्यनारायण हे तेलुगू सिनेइंडस्ट्रीतील सर्वात प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत ७५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते चित्रपट निर्माते म्हणूनही परिचित होते. कैकला सत्यनारायण यांनी महेश बाबू ते एनटीआर आणि यश यांच्यासोबतही काम केले आहे. १९९६ मध्ये त्यांनी मछलीपट्टणममधून विभागातून खासदार म्हणूनदेखील काम केले. सत्य नारायण यांनी १९६० साली नागेश्वरम्मा यांच्यासोबत लग्न केले. त्यांना दोन मुली आणि दोन मुलगे आहेत. 

मागील वर्षीही दमाच्या तक्रारीमुळे कैकला सत्यनारायण यांना हैदराबादमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कैकला यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत.