Join us  

सोनू सूदनं एकाच ओळीतून व्यक्त केलं दु:ख; ट्विट करून म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 4:25 PM

पालिकेनं पाठवलेल्या नोटिशीविरोधात सोनू सूद उच्च न्यायालयात

मुंबई: कोरोना संकट काळात शेकडो लोकांना मदत करणारा, देशाच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या कामगारांना, मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास मोलाचं सहकार्य करणारा अभिनेत्रा सोनू सूदला मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली. सोनूनं अवैध बांधकाम केल्याचा आरोप पालिकेनं केला आहे. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सोनूनं केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.मुंबई महापालिकेनं बजावलेल्या नोटिशीला सोनूनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. एका बाजूला न्यायालयात सुनावणी सुरू असताना सोनू सूदनं एक ट्विट करत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. 'मसला यह भी है दुनिया का.. कि कोई अच्छा है तो अच्छा क्यों है ।', असं सोनूनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोनूच्या ट्विटला आतापर्यंत १७ हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तर जवळपास दीड हजार लोकांनी त्याचं ट्विट रिट्विट केलं आहे. सोनू सूदनं कालदेखील एक सूचक ट्विट केलं होतं. 'किस की मदद करने का मुहूर्त ना तो कभी था और ना ही कभी होगा. अभी नहीं तो कभी नहीं', असं सोनूनं ट्विटमध्ये म्हटलं होतं.काय आहे प्रकरण?सोनू सूदनं कोणत्याही परवानगीशिवाय सहा मजली निवासी इमारतीचं रुपांतर हॉटेलमध्ये केल्याचा आरोप पालिकेनं केला आहे. या प्रकरणी पालिकेनं ७ जानेवारीला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पालिकेनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोनूला नोटीस पाठवली होती. या नोटिशीविरोधात सोनूनं डिसेंबरमध्ये दिवाणी न्यायालयात आव्हान दिलं. मात्र न्यायालयानं त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर सोनूनं उच्च न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :सोनू सूद