Join us  

एक वर्ष पूर्ण झाले...! सोनाली बेंद्रेची ही पोस्ट तुम्हाला करेल भावूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 10:07 AM

कॅन्सरला मात देऊन आपली नवी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने एक मोनोक्रोम फोटो शेअर करत, चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देजुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती.

कॅन्सरला मात देऊन आपली नवी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने एक मोनोक्रोम फोटो शेअर करत, चाहत्यांचे आभार मानले आहेत. आजारापणाच्या काळात खंबीर पाठींबा दिल्याबद्दल तिने चाहत्यांप्रती आभार व्यक्त केले आहेत. जुलै २०१८ मध्ये सोनालीला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. याला एकवर्षे पूर्ण झाले आहेत. कर्करोगाच्या निदानानंतर सोनाली उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाली होती. न्यूयॉर्कमध्ये राहून प्रदीर्घ उपचार घेतल्यानंतर सोनाली काही महिन्यांपूर्वी भारतात परतली. कर्करोगाशी लढताना इतरांना प्रेरणा देण्यासाठी सोनालीने कायमच तिचा हा प्रवास सामाजिक माध्यमांवर शेअर केला आहे. ‘स्विच ऑन द सनशाईन’ हा हॅशटॅग तिने आतापर्यंत शेअर केलेल्या प्रत्येक फोटोसाठी वापरला आहे. कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर अजिबात खचून न जात सोनालीने कायमच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कर्करोग झाल्यानंतर लोक हताश होतात, भयंकर तणावातून जातात पण सोनालीने या सगळ्यांसाठी एक आदर्श घालून दिला.

सोनाली लिहिते,वेदनादायी काळात खंबीर राहा, वेदनेतून फुल फुलवा. तुम्ही माझी मदत केलीत...आता माझ्या आतील फुलांना बाहेर काढा. ही फुले आणखी उमलतील...आणखी वेगाने...तुम्हाला जेव्हा केव्हा गरज भासेल...केवळ फुलांसारखे उमलत राहा. एक वर्षे पूर्ण झाले. तुम्ही सगळे किती महत्त्वपूर्ण आहात, हे सांगू शकत नाही. मला यातून बाहेर काढण्यासाठी, माझी मदत करण्यासाठी आभार...असे सोनालीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मी जगेल याचीही शाश्वती नव्हती...‘कॅन्सरचे निदान हा माझ्यासाठी धक्का होता. पुढचा प्रवास कसा असेल, या विचाराने माझी तहान-भूक हरवली होती. या आजारासाठी मीच जबाबदार आहे, असा विचार करून करून मी दिवसरात्र रडायचे. स्वत:ला दोष द्यायचे.  न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी गेल्यावर मानसोपचार तज्ज्ञाने ने मला यातून मला बाहेर काढले. उपचारादरम्यान माझ्यावर एक मोठी सर्जरी करावी लागणार होती. यातून मी वाचेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती. माझ्या मुलाला मी पुन्हा पाहू शकेल की नाही, हीही शाश्वती नव्हती. सर्जरीला जाताना माझ्या बहिणीने मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माज्यासाठी प्रचंड वेदनादायी होता. सुदैवाने ती सर्जरी यशस्वी झाली आणि मी जिवंत परतले,’ असे सोनालीने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले होते. हे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

टॅग्स :सोनाली बेंद्रे