Join us  

'माझ्याकडून भूमिका काढून घेतल्या; अंडरवर्ल्डच्या दबावामुळे सोनाली बेंद्रेने गमावले चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 3:37 PM

Sonali bendre: अलिकडेच सोनालीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ९० च्या काळात अंडरवर्ल्डचा बॉलिवूडवर कसा दबाव होता हे सांगितलं.

 एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर (bollywood) अंडरवर्ल्डचा दबाव होता. यात ९० च्या दशकात तर अनेक कलाकारांची नाव अंडरवर्ल्डसोबत जोडली गेली होती. इतंकच नाही तर त्या काळात दिग्दर्शक, निर्मात्यांवरही दबाव टाकून एखाद्या कलाकाराला सिनेमात कास्ट केलं जायचं किंवा त्यांना सिनेमातून बाहेर काढलं जायचं. आज अनेक कलाकार बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्याविषयी व्यक्त होताना दिसतात. यामध्येच अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिने एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं होतं. अंडरवर्ल्डच्या दबावामुळे मी अनेक सिनेमात काम केलं नाही, असं ती म्हणाली.

अलिकडेच सोनालीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ९० च्या काळात अंडरवर्ल्डचा बॉलिवूडवर कसा दबाव होता हे सांगितलं. त्यामुळे मला अनेक सिनेमा सोडावे लागले असंही ती उघडपणे म्हणाली.

"९० च्या काळात दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यावर अंडरवर्ल्डचा खूप दबाव होता. ते याच दबावाखाली काम करायचे. त्यावेळी  अनेक सिनेमात चुकीच्या मार्गाने पैसे वापरले जायचे. विशेष म्हणजे जर या कामात कलाविश्वातील कोणत्याही व्यक्तीने त्यांची साथ द्यायला नकार दिला तर त्यांच्या हातून सगळं काम निसटून जायचं. आणि, त्यांना पुन्हा काम सुद्धा मिळायचं नाही", असं सोनाली म्हणाली.

पुढे ती सांगते, "ज्या सिनेमात अंडरवर्ल्डचा पैसा वापरला गेलाय त्या सिनेमापासून मी कायम लांब रहायचे. त्यामुळे माझ्या हातून अनेक सिनेमा गेले. माझ्यासोबत अनेकदा असं झालं की, मी एखादा सिनेमा साइन केला पण ऐनवेळी ती भूमिका माझ्या हातून काढून घेतली आणि दुसऱ्या कोणाला तरी दिली. बऱ्याचदा असंही झालं की डायरेक्टर किंवा को-अॅक्टर  फोन करुन त्यावेळची परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न करायचे."

 दरम्यान, त्यावेळी गोल्डी बहल यांनी सोनालीला बरीच मदत केली. गोल्डी बहल हे सोनाली बेंद्रेचे बॉयफ्रेंड होते. तसंच ते कलाविश्वातही सक्रीय होते. त्यामुळे कोणत्या सिनेमात गैरमार्गाने पैसे लावले आहेत हे त्यांना कळायचं.आणि, ते सोनाली यांना सांगायचे. त्यामुळे सोनाली यांना अनेक सिनेमा सोडावे लागले होते, असंही तिने सांगितलं. सोनाली बेंद्रेने ओटीटीवर पदार्पण केलं असून नुकतीच त्यांची द ब्रोकन न्यूज ही वेबसीरिज रिलीज झाली आहे.

टॅग्स :सोनाली बेंद्रेबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमागुन्हेगारी जगत