कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी बनून आली आहे. सरकारचे अनेक प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. संक्रमितांची संख्या आणि कोरोना मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. अशात आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तगडा सल्ला दिला आहे. या अशा काळात इमेज बनवण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवणे अधिक गरजेचे आहे, असे अनुपम यांनी म्हटले आहे, अनुपम खेर पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi ) किती मोठे समर्थक आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेत. पहिल्यांदा त्यांनी जाहिरपणे मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
बुधवारी ‘एनडीटीव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम यांनी ही भूमिका मांडली. देशातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर ते बोलले. ‘कोव्हिड 19 ची दुसरी लाट भीषण आहे आणि यादरम्यान देशात जे काही सुरू आहे, त्यासाठी सरकारला जबाबदार ठरवणे गैर नाही. अधिका-यांवर जाहिर टीका होत असेल तर ती सुद्धा अनेकप्रसंगी योग्य आहे. या कठीण काळात इमेज बनवण्यापेक्षा जीव वाचवणे गरजेचे आहे, हे सरकारला समजायला हवे. आरोग्य व्यवस्थापनात सरकार कुठे ना कुठे चुकले आहे, ’ असे ते म्हणाले. सरकार काही प्रमाणात चुकले आहेत. पण म्हणून अन्य राजकीय पक्षांनी या त्रूटींचे राजकारण करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
आएगा तो मोदीही...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका करणा-यांना अनुपम खेर यांनी दोन आठवड्यांपूर्वीच ‘आएगा तो मोदीही’ अशा शब्दांत उत्तर दिले होते. यावरून अनुपम खेर जबरदस्त ट्रोलही झाले होते.