Join us  

Birthday Special : स्मित हास्य ते शेवटची इच्छा...! अशी स्मिता होणे नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:24 AM

सहजसुंदर अभिनयाने आणि आपल्या निखळ हास्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांची आज जयंती.

ठळक मुद्देमृत्यूनंतर तिचे पार्थिव नववधूप्रमाणे सजवले जावे, अशी स्मिताची इच्छा होती.

सहजसुंदर अभिनयाने आणि आपल्या निखळ हास्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील.स्मिता पाटील यांची आज जयंती. उणेपुरे 31 वर्षांचे आयुष्य आणि 75 चित्रपट असा तिचा प्रवास राहिला. दूरदर्शनची वृत्त निवेदिका ते यशस्वी अभिनेत्री या प्रवासात उत्तम सिनेमे देऊन तिने चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केले होते होते.

17 ऑक्टोबर 1955 मध्ये पुण्यात स्मिताचा जन्म झाला. निखळ हास्याची देण तिला जन्मताच लाभली होती. पाळण्यातील लेकीच्या चेह-यावरचे लोभस हास्य बघूनच तिच्या आईने तिचे ‘स्मिता’ हे नामकरण केले होते.

स्मिता ही संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली गेली. पण पडद्यावर गंभीर दिसणाररी स्मिता ख-या आयुष्यात  कमालीची खोडकर होती.सिनेमांमध्ये येण्याआधी स्मिता दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिका होती. वृत्तनिवेदिका म्हणून साडी नेसणे बंधनकारक होते. पण स्मिताला जीन्स आवडायची. मग ती जीन्सवरच साडी नेसायची.

स्मिताचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.  दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिताच्या करिअरचा प्रवास सुरु झाला. पण श्याम बेनेगल यांनी तिच्यातील प्रतिभा हेरली आणि बॉलिवूडच्या एका प्रतिभाशाली अभिनेत्रीचा जन्म झाला. १९७२ साली स्मिता टेलिव्हिजनवर दिसली  त्यावेळी ती केवळ   १७-१८ वर्षांची होती.  १९७५मध्ये  श्याम बेनेगल यांनी ‘चरणदास चोर’ या चित्रपटासाठी स्मिताला साईन केले आणि या चित्रपटाने स्मिताला ख-या अर्थाने स्टार बनवले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. विसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या स्मिताने ७५ चित्रपट केलेत. निधनानंतर तिचे १४ चित्रपट रिलीज झालेत.

स्मिताचे खासगी आयुष्य बरेच वादळी राहिले. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असताना तिला अनेकांचा रोष सहन करावा लागला. कारण राज बब्बर विवाहित होते. त्यांना दोन मुले होती. विवाहित राज बब्बर स्मिताच्या प्रेमात आकंठ बुडाले. स्मिताही त्यांच्यासोबत राहू लागली. पण खुद्द स्मिताच्या आईला तिचे हे रिलेशन मान्य नव्हते. पण आईचे एक न ऐकता स्मिताने राज यांच्यासोबत विवाह केला. मीडियाने  टीका करण्यास सुरुवात केली. स्मिताला ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आले.  या टीकेने स्मिता आतून खचली होती. इतकी की, तिच्या संवेदनशील मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता लग्नानंतर अचानक शांत  झाली होती. अनेकदा राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचा विचारही तिच्या मनात आला होता. अर्थात स्मिताने असे काही केले नाही. पण नियतीने मात्र हा विचार नेमका अमलात आणला.   १३ डिसेंबर १९८६ रोजी राज व स्मिता यांचा मुलगा प्रतिक याचा जन्म झाला. पण प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या सहा तासांत स्मिताने जगाचा निरोप घेतला. राज बब्बर यांच्या आयुष्यातून स्मिताने कायमची एक्झिट घेतली.

मृत्यूनंतर तिचे पार्थिव नववधूप्रमाणे सजवले जावे, अशी स्मिताची इच्छा होती.  मेकअपमॅन दीपक सावंत यांच्याकडे तिने ही इच्छा बोलून दाखवली होती.  निधनानंतर तिचे पार्थिव तीन दिवस बर्फात ठेवण्यात आले होते. कारण स्मिताची बहीण अमेरिकेत राहत होती.  स्मितावर अत्यंसंस्काराची वेळ आली आणि तिची अखेरची इच्छा पूर्ण केली गेली.  दीपक सावंत यांनी स्मिताच्या पार्थिवाचे नववधूप्रमाणे मेकअप केले. 

दीपक सावंत यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, एकदा कुठल्याशा सिनेमाच्या सेटवर राज कुमार लेटले होते आणि त्यांचा मेकअपमन त्यांचे मेकअप करत होता. स्मिताने हे पाहिले आणि माझेही असेच मेकअप कर, असे मला  म्हणाली. पण मी तिला नकार दिला. मॅडम, मी असे काहीही करणार नाही. जणू एखाद्या मृतदेहाचे मेकअप करतोय. हे माझ्याने होणार नाही, असे मी म्हणालो. पण एक दिवस मीच तिचे तसे मेकअप केले.

टॅग्स :स्मिता पाटीलराज बब्बर