Akshay Kumar Saif Ali Khan Movie: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'हैवान' या थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'हैवान' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेता सैफ अली खानदेखील आहे. अक्षय व सैफ १८ वर्षांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. ते दोघे शेवटचे 'टशन' या २००८ साली आलेल्या चित्रपटात झळकले होते. यातच आता अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. ज्यामुळे या चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे.
'हैवान' चित्रपटातून एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या आणि अभिनेत्री श्रेया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) आहे. श्रेया 'हैवान' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. 'हैवान' हा एक थ्रिलर चित्रपट असल्यामुळे यात श्रेयाच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळतील अशी शक्यता आहे. श्रेया पिळगावकर ही तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते.
'मिर्झापूर', 'गिल्टी माइंड्स', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'मंडला मर्डस' यांसारख्या वेब सीरिजमध्ये तिने दमदार काम केले आहे. तिच्या अभिनयाची नेहमीच प्रशंसा झाली आहे. आता ती थेट अक्षय कुमार आणि सैफ अली खानसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करत असल्यामुळे तिचे चाहते खूप आनंदी आहेत. 'हैवान' हा चित्रपट 'ओप्पम' या मल्याळी चित्रपटाचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे. 'हैवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.