Join us  

या मुलाने मराठीसोबतच गाजवलीय बॉलिवूड इंडस्ट्री, ओळखा पाहू कोण आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 5:19 PM

या अभिनेत्याने एका हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे.

ठळक मुद्देश्रेयसने काही महिन्यांपूर्वी त्याचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या शालेय जीवनातील असून या फोटोतील त्याचा अंदाज त्याच्या चाहत्यांना आवडत आहे.

श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म मुंबईतील आहे. त्याने मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्याच दरम्यान त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आज केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रेयसने मराठी चित्रपटसृष्टीद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मराठी नाटकं आणि मालिकांमध्ये काम केले.

श्रेयसने काही महिन्यांपूर्वी त्याचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या शालेय जीवनातील असून या फोटोतील त्याचा अंदाज त्याच्या चाहत्यांना आवडत आहे. श्रेयस लहानपणी देखील खूपच छान दिसायचा असे त्याचे चाहते त्याला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

श्रेयसने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आभाळमाया या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्याने ‘गोलमाल’सीरिज, ‘इकबाल’, ‘डोर’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटात आणि ‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहे. कॉमेडी, गंभीर अशा सगळ्याच भूमिका तो चांगल्याप्रकारे साकारू शकतो हे त्याने त्याच्या अभिनयातून सिद्ध केले आहे.

नागेश कुकुनूरच्या २००५ मधील इकबाल या चित्रपटामधून श्रेयसने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात त्याने एका मूक-बधीर मुलाची भूमिका साकारली होती. 

श्रेयसने वो, पार्टनर्स ट्रबल हो गयी डबस, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, माय नेम इज लखन यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याला त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

श्रेयसने अभिनयासोबतच दिग्दर्शनामध्ये देखील त्याचे भाग्य आजमावले आहे. सनी देओल, बॉबी देओल, समीक्षा भटनागर यांची मुख्य भूमिका असलेल्या पोस्टर बॉईज या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. 

टॅग्स :श्रेयस तळपदे