Join us  

दु:खद! दिग्गज कोरिओग्राफर शिवा शंकर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:11 AM

Choreographer Shiva Shankar master passes away : मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का, टॉलिवूडवर शोककळा

साऊथ सिनेमाचे दिग्गज कोरिओग्राफर (Choreographer) शिवा शंकर मास्टर (Shiva Shankar master ) यांचं निधन झालं. ते  72 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनानं संक्रमित होते. हैदराबादेतील आयजी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. याचदरम्यान काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे टॉलिवूड व बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवा शंकर आणि त्यांच्या मोठ्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती.  यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच शिवा शंकर यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

शिवा शंकर यांनी चार दशकांपर्यंत टॉलिवूडची अनेक आयकॉनिक गाणी कोरिओग्राफ केली. 1970 मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. साऊथच्या अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. मगधीरामधील प्रसिद्ध गाणं धीरा धीरा धीरा शिवा शंकर यांनीच कोरिओग्राफ केलं होतं. या गाण्यासाठी त्यांना 2011 मध्ये   राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

सोनू सूदने वाहिली श्रद्धांजली

शिवा शंकर यांना आर्थिक अडचणींमुळे चांगले उपचार मिळू शकत नसल्याची बातमी आल्यावर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला होता. शिवा शंकर यांच्या निधनानंतर सोनूनं ट्विट करून शोक व्यक्त केला.‘ शिवशंकर मास्तर यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण देवानं काही वेगळंच ठरवलं होतं. मास्तरजींना आपण सदैव लक्षात ठेवू. हे दु:ख सहन करण्याची ईश्वर त्यांच्या कुटूंबियांना शक्ती देवो. चित्रपट सदैव तुमची आठवण ठेवेल सर.’अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं आहे.

प्रख्यात निर्माता आणि दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी देखील शिवा शंकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

टॅग्स :Tollywood