Join us  

अभिनेता शिवकुमार वर्मा रुग्णालयात दाखल असताना कोणीच केली नाही मदत, मुलीने सांगितली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 3:38 PM

शिवकुमार अनेक वर्षं चित्रपटसृष्टीचा भाग असले तरी त्यांच्या आजारपणात कोणताच कलाकार त्यांच्या मदतीसाठी धावला नाही असा आरोप त्यांच्या मुलीने केला आहे.

ठळक मुद्देशिवकुमार यांना क्रॉनिक ऑबस्ट्रेक्टिव्ह पल्मोनरी डीजीज हा आजार झाला असल्याने त्यांची तब्येत प्रचंड ढासळली होती. त्यांच्या या कठीण काळात केवळ त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती.

शिवकुमार वर्मा यांनी हल्ला बोल, बाजी जिंदगी की यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. शिवकुमार हे गेल्या अनेक दिवसापासून आजरी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. आता त्यांची तब्येत चांगली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शिवकुमार अनेक वर्षं चित्रपटसृष्टीचा भाग असले तरी त्यांच्या आजारपणात कोणताच कलाकार त्यांच्या मदतीसाठी धावला नाही असा आरोप त्यांच्या मुलीने केला आहे. शिवकुमार यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे.

शिवकुमार यांना क्रॉनिक ऑबस्ट्रेक्टिव्ह पल्मोनरी डीजीज हा आजार झाला असल्याने त्यांची तब्येत प्रचंड ढासळली होती. त्यांच्या या कठीण काळात केवळ त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती. याविषयी त्यांची मुलगी राजसीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, हे दिवस माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट दिवस होते. माझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची तब्येत सुधारायला लागल्यावर त्यांना सहा दिवसांनंतर व्हेंटिलेटवरवरून काढण्यात आले. पण या काळात माझ्या वडिलांकडे पाहाणारी केवळ मी एकटी होती. माझा भाऊ त्याच्या प्रेयसीसोबत वेगळा राहातो. त्यामुळे या कठिण प्रसंगात माझ्या पाठिशी कोणीच उभे नव्हते.

तिने पुढे सांगितले आहे की, माझे वडील अनेक वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीचा भाग आहेत. त्यांना चित्रपटसृष्टीतील मंडळींनी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते. पण त्यांच्या मदतीसाठी कोणीच पुढे आले नाही. मला फोन करून काहींनी त्यांच्या तब्येतीविषयी विचारले, पण कोणी मदत केली नाही. मी जमवलेले पाच लाख रुपये माझ्या वडिलांच्या रुग्णालयाच्या बिलसाठी खर्च केले. केवळ अभिनेत्री कुनिका लाल यांनी मला मदत केली. तसेच डॉक्टरांनी माझ्या वडिलांची काळजी घेतली यासाठी मी त्यांचे आभार मानते.

सिन्टाने शिवकुमार यांना मदत करण्याचे आवाहन करण्यासाठी ट्वीट केले होते. तसेच सिन्टाने त्यांना ५० हजारांची मदत केली होती असे सिन्टाचे अमित बहल यांनी सांगितले. 

टॅग्स :बॉलिवूड