बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा हे दोघे पुन्हा अडचणीत आले आहेत. शिल्पा आणि राज यांच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तब्बल ६०. ४८ कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. हे प्रकरण त्यांच्या बंद पडलेल्या Best Deal TV Pvt Ltd या ऑनलाइन शॉपिंग कंपनीशी संबंधित आहे. तक्रारदार दीपक कोठारी हे मुंबईतील व्यावसायिक असून Lotus Capital Financial Services या कंपनीचे संचालक आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दीपक कोठारी यांचा आरोप आहे की, २०१५ मध्ये शिल्पा-राज यांनी कंपनीचा विस्तार करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली, पण ती कंपनीसाठी न वापरता वैयक्तिक खर्चासाठी वापरली. कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शिल्पा आणि राज यांच्याकडे १२ टक्के व्याजदराने ७५ कोटींचे कर्ज मागितले होते. पण टॅक्स वाचवण्यासाठी त्यांनी हे पैसे गुंतवणूकीसाठी वापरावेत म्हणून सल्ला दिला. म्हणूनच एप्रिल २०१५मध्ये ३१ कोटी आणि सप्टेंबर २०१५ मध्ये २८ कोटी त्यांनी गुंतवणुकीसाठी दिले. कोठारी यांनी जे पैसे गुंतवले त्यासाठी शिल्पा आणि राजने त्यांना वैयक्तिक हमीही दिली होती.
मात्र, २०१६ मध्ये शिल्पा शेट्टीने संचालक पदाचा राजीनामा दिला आणि नंतर कंपनीविरुद्ध १.२८ कोटींचे दिवाळखोरीचे प्रकरण निघाले. याबाबत कोठारी यांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे कोठारी यांनी गुंतवलेले पैसे बुडाले याशिवाय शिल्पा-राज यांनी त्यांचे पैसे परत दिले नाहीत. या तक्रारीवर आधारित जुहू पोलीस ठाण्यात शिल्पा-राज विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने प्रकरण हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आले असून तपास सुरू आहे.
शिल्पा आणि राज यांच्या वकिलांनी मात्र हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल, मुंबईने (NCLT) या संदर्भात आधीच निर्णय दिला आहे. त्यांनी EOW ला सर्व कागदपत्रे आणि तपशील दिल्याचेही सांगितले आहे. या प्रकरणामुळे शिल्पा-राज यांचे नाव पुन्हा एकदा वादात आले असून, पुढील तपास आणि न्यायालयीन सुनावणीवर सर्वांचे लक्ष आहे.