Join us  

"तो नमाज पठण करायला जायचा अन्..." शेखर कपूर यांनी सांगितला ए आर रहमान यांचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 6:08 PM

रहमान यांच्या सुरुवातीच्या काळात शेखर कपूर यांनीच...

फिल्म निर्माते शेखर कपूर (Shekhar Kapoor) हे आपले गुरु असल्याचं संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) म्हणाले होते. तर शेखर कपूर यांनी रहमान यांना खूप विनम्र आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं. रहमान यांच्या सुरुवातीच्या काळात शेखर कपूर यांनीच त्यांना आत्मविश्वास दिला होता. रहमान परदेशात आपल्या करिअरची सुरुवात करणार होते. शेखर कपूर यांनी रहमान यांच्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग किस्से सांगितले. 

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मुलाखतीत शेखर कपूर यांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ब्रॉडवे म्युझिकल'मध्ये रहमान यांच्यासोबत काम करतानाचे दिवस आठवले. ते म्हणाले, "जेव्हा मी त्याला भेटलो तोपर्यंत त्याचं इंडस्ट्रीत नाव झालं होतं.मी त्याला तंत्रज्ञानाविषयी सल्ला दिला आणि त्याला परदेशात घेऊन गेलो. मी बॉलिवूड थीमवर आधारित म्यूझिकल बॉम्बे ड्रीम्सची निर्मिती केली. मी संगीतकार एंड्र्यू लॉयड वेबरसोबत काम केले. रहमानला घेऊन येत असताना एंड्रयू खूप त्रासलेला होता. मी एन्ड्र्यूची रहमानसोबत काम करण्यासाठी समजूत काढली. रहमानही थोडा घाबरलेला होता. तेव्हा मी त्याला म्हणालो जर त्यांनी माझा स्वीकार केला आहे तर ते तुझाही करतील."

ते पुढे म्हणाले, "रहमानला त्याच्या प्रार्थनेतून खूप काही सुचतं. जेव्हा मी त्याच्यासोबत काम करत होतो तेव्हा एकदा तो म्हणाला की तुम्ही बसा मी आलोच. तो काहीवेळाने परत आला आणि त्याने एक तान ऐकवली. जेव्हा तो माफी मागतो तेव्हा तो नमाज पठण करतो. त्या प्रार्थनेत तो एकचित्ताने ऐकतो आणि नंतर त्याला जे सुचलंय ते ऐकवतो. त्यावर त्याचा खूप विश्वास असतो. त्याला एक इशारा मिळतो आणि तो पूर्ण गाणं बनवतो. मी त्याच्यात एक विनम्रता पाहिली आणि त्याच्यात थोडाही गर्व दिसत नाही."

टॅग्स :शेखर कपूरए. आर. रहमानबॉलिवूड