Join us  

'माझे केस कापले, स्विमिंग पूलमध्ये ढकललं' आणि..; मिथुन चक्रवर्तींनी केलं होतं शक्ती कपूरचं रॅगिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 2:28 PM

मिथुन चक्रवर्ती आणि शक्ती कपूर यांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे.

बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि शक्ती कपूर (Shakti Kapoor). एकाने खलनायकाच्या भूमिका गाजवल्या. तर, दुसऱ्याने त्याच्या डान्समुळे चाहत्यांना वेड लावलं. त्यामुळे आजही या दोन्ही कलाकारांचा सिनेसृष्टीत दबदबा पाहायला मिळतो. या दोन्ही कलाकारांनी एफटीआयआय (FTII) मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. यावेळी मिथुन चक्रवर्ती हे शक्ती कपूर यांचे सिनिअर होते.  अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये शक्ती कपूर यांनी त्यांच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलत असताना मिथून चक्रवर्तीने कॉलेजमध्ये माझं रॅगिंग केलं होतं, असा खुलासा शक्ती कपूर यांनी केला.

टाइमआऊट विथ अंकित या पॉडकास्टमध्ये शक्ती कपूर यांनी नुकतीच हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी रवी आणि अनिल वर्मन यांच्यासोबत  दिल्ली ते पुणे या प्रवासात कशी भेट झाली हे सांगितलं. सोबतच कॉलेजमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्याच दिवशी मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत पहिली भेट झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

"राकेश मला कॉलेजपर्यंत सोडायला आला होता. कॉलेजमध्ये गेलो तेव्हा एक व्यक्ती तिथे काम करत होता. तो व्यक्ती म्हणजे मिथून चक्रवर्ती. आम्ही कॉलेजमध्ये पोहोचल्यावर मिथूनने त्याची ओळख सांगितली. त्यानंतर राकेश आणि प्रमोद खन्ना हे शक्ती कपूर यांना कॉलेजमध्ये सोडून निघून गेले.  त्यानंतर मिथून चक्रवर्तीने माझ्या केसांना धरलं आणि तो सिनिअर असल्याचं मला सांगितलं. त्यानंतर त्याने मला एका खोलीत नेलं आणि एका कोपऱ्यात उभं राहायला सांगितलं. आणि, त्याच्या मित्रांना बोलावलं" असं शक्ती कपूर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "त्यांनी खोलीतले लाईट बंद केले आणि माझ्यावर स्पॉटलाइट मारला. मग मला विचारलं, तुला बिअर प्यायची आहे का? इतंकच नाही तर माझे केस सुद्धा त्यांनी कापले आणि मला स्विमिंग पूलमध्ये ढकललं. या प्रकारामुळे मी खूप हमसून हमसून रडलो होतो. मी फार घाबरलो होतो. पण, त्यानंतर आम्ही खूप चांगले मित्र झालो."

दरम्यान, मिथुन आणि शक्ती यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. यात बादल, प्यार का कर्ज, दलाल, गुंडा यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

टॅग्स :शक्ती कपूरमिथुन चक्रवर्तीबॉलिवूडसेलिब्रिटी