Join us  

शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी, सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री अन् तगडं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:21 AM

Shehnaaz Gill: बिग बॉस फेम शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटात काम करताना ती दिसणार आहे.

पंजाबची कतरिना कैफ आणि 'बिग बॉस १३' (Bigg Boss 13) ची स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Gill) सलमान खान(Salman Khan)च्या 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. शहनाज गिलसोबतच तिचे चाहतेही याबद्दल खूप उत्सुक आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून शहनाज गिलला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. एवढेच नाही तर सलमान खानने शहनाज गिलला चित्रपटासाठी मागितलेली रक्कमही दिली आहे. शहनाज गिलशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज गिलशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, सलमान खानने शहनाज गिलला तिचे मानधन निवडण्याची संधी दिली. याबद्दल बोलताना त्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, "शहनाज गिलचा अंदाज आणि स्टाईल पाहून सलमान खानने तिला या चित्रपटासाठी स्वतःचे मानधन ठरवण्याची संधी दिली आहे." शहनाज गिलच्या साधेपणाने सलमान खानला असे करण्यास भाग पाडले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात शहनाज गिल सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तिचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसत होती. हा व्हिडीओ पाहून तिने चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.शहनाज गिल व्यतिरिक्त अभिनेता आयुष शर्मा आणि पूजा हेगडे देखील 'कभी ईद कभी दिवाली' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्याच्याशिवाय राघव जुयाल आणि झहीर इक्बाल देखील दिसणार आहेत. 'कभी ईद कभी दिवाली'पूर्वी शहनाज गिल पंजाबी चित्रपट 'हौंसला रख'मध्ये दिसली होती.

टॅग्स :शेहनाझ गिलसलमान खानबिग बॉस