Join us

​जे घडलचं नाही, त्याबद्दल काय बोलणार शाहीद-करिनाचे जोरदार बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 16:20 IST

‘उडता पंजाब’च्या निमित्ताने शाहीद कपूर आणि करिना कपूर एकत्र आले. पत्रकारांनी  करिना व शाहीदवर प्रश्नांचा भडिमार केला.  मात्र पत्रकारांच्या प्रश्नांवर शाहीद व करिना दोघांनीही जोरदार बॅटिंग करीत भन्नाट उत्तरे दिली.

शाहीद कपूर आणि करिना कपूर यांच्यातील अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या आपल्यासाठी नव्या नाहीत. ‘जब वुई मेट’च्या सेटवर या दोघांत सूत जुळले आणि नंतर दोघांचेही फाटले, असे मानले जाते. ब्रेकअपनंतर  हे दोघे कधीच एकत्र काम करणार नाहीत, अशाही बातम्या उमटल्या. पण ‘उडता पंजाब’च्या निमित्ताने हे दोघे आता आॅनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत.  या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करिना व शाहीद एकत्र आले. पत्रकारांनी साहजिकच करिना व शाहीदवर प्रश्नांचा भडिमार केला. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांवर शाहीद व करिना दोघांनीही जोरदार बॅटिंग करीत भन्नाट उत्तरे दिली. ‘जब वुई मेट’मधील तुमची क्रेमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. ‘जब वुई मेट’चा सिक्वल बनल्यास तुम्ही दोघे त्यात काम करणार का? अशा प्रश्न एका पत्रकाराने करिना व शाहीदला विचारला. यावर, जे घडलेच नाही,त्याबद्दल आम्ही समाधानी वा असमाधानी आहोत का, असे तुम्हाला विचारायचे आहे का, असा प्रतिप्रश्न शाहीदने पत्रकारांना केला. याचदरम्यान करिनानेही शाहीदचे बोलणे मध्येच तोडत आम्हा दोघांना एकत्र बघायचे तर ‘जब वुई मेट’ची डिव्हीडी बाजारात उपलब्ध आहे, असे सांगत हशा पिकवला. ‘जब वुई मेट’च्या सिक्वलमध्ये आम्ही असणार की नाही,याचे उत्तर इम्तियाज अलीच देऊ शकेल. त्याला तो बनवायचा असता तर त्याने तो कधीच बनवला असता. कदाचित इम्तियाजनेही झालेले सगळे विसरून पुढे जाणे श्रेयस्कर मानले असावे, असे सूचक विधान शाहीदने केले. या प्रमोशनमध्ये शाहीद व करिना दोघेही परस्परांपासून अंतर राखून दिसले. व्यासपीठावरही आलिया भट पूर्णवेळ या दोघांच्यामध्येच उभी होती. करिना व शाहीद यांनी पत्रकारांना पोझ देतानाही आलियाला आपल्या सोबत ठेवले होते.