Join us

शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं तिसरं गिफ्ट!, 'ब्रह्मास्त्र' संदर्भात मोठी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:41 IST

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवस बादशाहाचा असला तरी गिफ्ट्स मात्र त्याच्या चाहत्यांना मिळत आहे. शाहरुखच्या चाहत्यांना पहिलं गिफ्ट तेव्हा मिळालं जेव्हा अर्ध्या रात्री त्यानं मन्नतच्या बाल्कनीत धाकटा लेक अबराम सोबत येऊन चाहत्यांना अभिवादन केले. त्यानंतर चाहत्यांना दुसरं गिफ्ट तेव्हा मिळालं जेव्हा शाहरुखच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. आता चाहत्यांना तिसरे गिफ्ट देखील मिळाले आहे. जे आलिया भट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाशी संबंधित आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जीने किंग खानच्या वाढदिवशी त्याच्या फॅन्सना एक खास गिफ्ट दिले आहे. हे गिफ्ट नेमके कोणते आहे हे जाणून घ्या. रणबीर-आलियाचा ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबर,२०२२ रोजी रिलीज झाला होता. ट्रोलर्सचा विरोध आणि बॉयकॉट ट्रेन्डचा सामना करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. ब्रह्मास्त्र पार्ट १च्या रिलीजनंतर कितीतरी दिवस ब्रह्मास्त्र पार्ट २ची चर्चा सुरू होती.

ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात शाहरुख खानने वानरास्त्र ही छोटीशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्याची छोटीशी झलक पाहूनही त्याचे चाहते खूश झाले होते. २०१८ नंतर शाहरुख खानला इतक्या वर्षांनी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. पण त्याआधी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तानं अयान मुखर्जीने एक छान गिफ्ट दिलं आहे.

अयानने डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणाऱ्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा पहिला १० मिनिटांचा भाग फ्री दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे पोस्टमधून सांगितले. या पहिल्या १० मिनिटातच शाहरुखची चित्रपटातील व्यक्तिरेखा समोर येते. अयानने पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''डिस्ने प्लस हॉट स्टारवर आजपासून सर्वांसाठी ब्रह्मास्त्रचा पहिल्या १० मिनिटांचा भाग मोफत..''

'ब्रह्मास्त्र'च्या कथेत देवची महत्त्वाची भूमिका आहे. देव हे रणबीर कपूर म्हणजेच शिवाचे वडील आहेत. पहिल्या भागात देवची थोडीशी झलक दिसली होती, पण लोक म्हणतात की तो रणवीर सिंग आहे. अनेक लोक हृतिक रोशनचे नावही घेत आहेत. काही दिवसांपूर्वी केजीएफ स्टार यशचे नावही समोर आले होते, मात्र करण जोहरने याला निरर्थक बातमी म्हटले होते. आता देवची भूमिका कोण साकारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, कारण या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये देवची कथा महत्त्वाची असणार आहे.

टॅग्स :शाहरुख खान