Join us  

दु:खद! ज्येष्ठ अभिनेते रविराज यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:00 PM

मराठी, हिंदी, गुजराती अशा अनेक चित्रपटांत झळकलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र अनंत कृष्णा राव अर्थात रविराज यांचे आज विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले.

ठळक मुद्देअनेक चित्रपट नावावर असलेले रविराज अनेक वर्षांपासून रूपेरी दुनियेच्या झगमटापासून दूर होते.

मराठी, हिंदी, गुजराती अशा अनेक चित्रपटांत झळकलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र अनंत कृष्णा राव अर्थात रविराज यांचे आज विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी उषा, मुलगा प्रितेश व मुलगी पूजश्री असा परिवार आहे. त्यांचे खरे नाव रवींद्र अनंत कृष्णा राव. चित्रपटासाठी त्यांचे ‘रविराज’ असे नामकरण झाले आणि पुढे तमाम चाहते त्यांना याच नावाने ओळखू लागले.  मराठी, हिंदूी, गुजराती चित्रपटांसह मराठी व्यावसायिक रंगभूमीवर २५ वर्षांहून  अधिक काळ  गाजवणारे रविराज यांचा जन्म मंगलोरचा.  

कानडी भाषिक असलेल्या रविराज  यांनी यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. उमेदीच्या काळात काही वर्षे नोकरी केल्यानंतर अचानक त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली. ‘शुरा मी वंदिले’  त्यांचा पहिला मराठी सिनेमा. नशिबाने साथ दिली आणि एकापाठोपाठ एक हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी वर्णी लागली. ‘आहट’ हा पहिला हिंदी सिनेमा त्यांना मिळाला. अर्थात हा सिनेमा काही वर्षे रेंगाळल्याने  ‘अचानक’, ‘जावई विकत घेणे आहे’ हे सिनेमे आधी रिलीज झालेत. 

‘जावई विकत घेणे आहे’ हा त्यांचा मराठी सिनेमा प्रचंड गाजला. यातील ‘या मिलनी रात्र ही रंगली’ हे गाणे त्याकाळात प्रचंड लोकप्रिय झाले होते.  या चित्रपटामुळे आणि गाण्यामुळे रविराज यांना अफाट लोकप्रियता मिळाली. यानंतर ओवाळिते भाऊराया, तूच माझी राणी, रूप पाहता लोचनी, देवापुढे माणूस, अजातशत्रू, दोस्त असावा तर असा अनेक अनेक मराठी सिनेमे त्यांनी केले. अन्यायाचा प्रतिकार हा त्यांनी काम केलेला शेवटचा सिनेमा.अचानक, तीन चेहरे, एक चिठ्ठी प्यार भरी, चांद का टुकडा,  खट्टा मिठा हे त्यांचे हिंदी सिनेमे.

अनेक चित्रपट नावावर असलेले रविराज अनेक वर्षांपासून रूपेरी दुनियेच्या झगमटापासून दूर होते. भाड्याच्या घरात राहत होते. कलाकारांच्या राखीव कोट्यातून घर मिळण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेत. पण त्यांना शेवटपर्यंत घर मिळाले नाही. अशोक सराफ ,मश्चिंद्र कांबळी ,रविराज यांनी दिल्या घरी तु सुखी रहा नाटकाचे १००च्या वर प्रयोग केले.

टॅग्स :बॉलिवूड