Join us  

वास्तव: 'मी चहा पित पायरीवर बसलो होतो..'; संजय नार्वेकरला संजय दत्तने दिली होती अशी वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 2:10 PM

Sanjay narvekar एका कार्यक्रमात संजय नार्वेकरने संजय दत्तने चारचौघात आपल्याला कशाप्रकारे वागणूक दिली होती यावर त्यांनी भाष्य केलं.

बॉलिवूडच्या इतिहासात विशेष गाजलेला सिनेमा म्हणजे वास्तव (vaastav). या सिनेमा अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) मुख्य भूमिकेत झळकला होता. गुंडगिरीच्या राज्यात संपूर्ण कुटुंब, व्यक्ती कशाप्रकारे उद्धवस्त होतात याचं उत्तम उदाहरण या सिनेमातून दाखवण्यात आलं. या सिनेमात संजय दत्तप्रमाणेच एक भूमिका गाजली ती म्हणजे देडफुट्याची. अभिनेता संजय नार्वेकरने (sanjay narvekar) ही भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळे सहकलाकाराची भूमिका असूनही संजय नार्वेकरांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये त्यांचं नाव झालं. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी या सिनेमाचा अनुभव शेअर केला. यावेळी संजय दत्तने चारचौघात आपल्याला कशाप्रकारे वागणूक दिली होती यावर त्यांनी भाष्य केलं.

मागील वर्षी संजय नार्वेकरांनी 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी वास्तवच्या सेटवर घडलेला एक किस्सा सांगितला. "ज्यावेळी वास्तव सिनेमा केला जाणार होता त्यावेळी या सिनेमातील देडफुट्याची भूमिका मी करावी अशी महेश मांजरेकरांची (mahesh manjrekar) इच्छा होती. मला आठवतंय मी रुईया कॉलेजच्या नाक्यावर होतो त्यावेळी मोबाईल वगैरे काही नव्हता. तेव्हा पेजर होते. तेव्हा मी सीनसाठी कपडे वगैरे घालून तयार होतो आणि मग तो सीन केला," असं संजय नार्वेकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले,"त्यावेळी पहिला शॉट झाला की ते फुटेज लॅबमध्ये पाहायला जावं लागायचं. आणि, लॅबमध्येल डेव्हलप होऊन चेक करावं लागायचं. ते पाहण्यासाठी संजय दत्त, महेश मांजरेकर अशी मुख्य मंडळी गेली होती. दुसऱ्या दिवशी त्याच बंगल्यात शूटिंग होतं. मी  मेकअप वगैरे करुन तेथे गेलो. आणि, चहा पीत तिथेच पायऱ्यांवर बसलो होतो कारण संजय दत्तला यायला वेळ होता. तेवढ्यात संजय दत्त तेथे आला आणि त्याला पाहून सगळ्यांनी त्याला हाय-हॅलो केलं. त्याने मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि 'काय भारी काम केलंय. मस्त काम केलंस. क्या बात हैं. मी हे महेशला पण सांगितलं'. त्यानंतर त्याने मॅनेजरला बोलावलं आणि जर यापुढे हा असा खाली बसलेला दिसला तर मी काय करेन माहितीये ना? यापुढे संजयला खुर्ची मिळायला हवी, चहा मिळायला हवा. मला तो कधीच खाली बसलेला दिसता कामा नये. असं दटावलं. त्या दिवसापासून मला  खुर्ची मिळायला लागली.

दरम्यान, १९९९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात संजय दत्त आणि नम्रता शिरोडकर ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर, रीमा लागू, शिवाजी साटम, मोहनीश बहल ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. 

टॅग्स :संजय नार्वेकरसंजय दत्तमहेश मांजरेकर बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा