Join us

"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:30 IST

संजय दत्तला स्टेज ४ फुप्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. पण, त्याने उपचार घेत कॅन्सरशी ही लढाई जिंकली. 

हिना खान, दीपिका कक्कर, ताहिरा कश्यप हे सेलिब्रिटी कॅन्सरशी झुंज देत आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन झालं. तर सोनाली बेंद्रे, किरण खेर, राकेश रोशन, महिमा चौधरी या सेलिब्रिटींनी कॅन्सरला हरवलं. यामध्ये अभिनेता संजय दत्तचं नावही घेतलं जातं. संजय दत्तला स्टेज ४ फुप्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. पण, त्याने उपचार घेत कॅन्सरशी ही लढाई जिंकली. 

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तने त्यांच्या कॅन्सरच्या जर्नीबद्दल भाष्य केलं होतं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर संजय दत्तच्या पायाखालची जमीन सरकली होती. मात्र त्याने मोठ्या जिद्दीने कॅन्सरला हरवल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "मला असं वाटतं की हा आजारच अस्तित्वात नसायला हवा होता. फक्त मीच नाही तर माझ्यासारखे अनेक जण जे या आजाराने ग्रस्त आहेत. आणि त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. लॉकडाऊनमधला तो एक नॉर्मल दिवस होता. मी पायऱ्या चढत होतो पण मला श्वास घेता येत नव्हता. मी अंघोळ केली. पण मला तरीही मला श्वास घ्यायला जमत नव्हतं. काय होतंय ते मला कळत नव्हतं. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरांना बोलवून घेतलं. त्यांनी एक्सरे केला आणि त्यात असं दिसलं की माझं फुप्फुस अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याने भरलेलं होतं. त्यांना ते पाणी काढावं लागलं". 

दुर्देवाने कॅन्सर असल्याचं समजलं...

"टीबी असावा अशी सगळे प्रार्थना करत होते. मात्र कॅन्सर असल्याचं समजलं. पण, आता हे मला कसं सांगणार असा प्रश्न होता. कारण मी कोणालाही दुखापत पोहोचवू शकलो असतो. मग माझी बहीण आली. मी असा होतो की मला कॅन्सर आहे, मग आता पुढे काय? मग आम्ही ट्रीटमेंटबाबत प्लॅनिंग केलं. पण, कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर मी ३ तास रडत होतो. माझी पत्नी, माझी मुलं, माझं आयुष्य एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर आलं. मी स्वत:ला समजावलं की मला खचलं नाही पाहिजे". 

"आम्ही अमेरिकेत ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं होतं. पण, व्हिसा मिळाला नाही. मग मी इथेच उपचार घ्यायचे ठरवलं. राकेश रोशन यांनी डॉ. शेवंती यांचं नाव मला सांगितलं. केमोथेरेपीनंतर केस गळतील, उलट्या होतील वगैरे असं सगळं त्यांनी मला सांगितलं होतं. पण, मी त्यांच्याकडे बघून फक्त एवढंच म्हणालो होतो की मला काहीच होणार नाही. मी केमोथेरेपीनंतर एक तास सायकल चालवायचो. मी नंतर हे प्रत्येक केमो सेशननंतर करायचो. दुबईत जेव्हा मी केमो घ्यायला जायचो तेव्हा मी केमो घेतल्यानंतर २-३ तास बॅडमिंटन खेळायचो", असं त्याने सांगितलं. २०२० मध्ये संजय दत्तने कॅन्सरपासून फ्री झाल्याचं सांगितलं होतं. 

टॅग्स :संजय दत्तकर्करोगसेलिब्रिटी