Join us  

'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:18 AM

Sameera reddy: पंकज उदास यांच्या औऱ आहिस्ता कीजिए बातें या गाण्यातून समीराने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या गाण्यानंतर तिचा चाहतावर्ग रातोरात वाढला आणि पहिल्याच ब्रेकमध्ये ती सुपरस्टार झाली.

'और आहिस्ता कीजिए बातें...' पंकज उदास (Pankaj Udas) यांचं हे सदाबहार गाणं ऐकलं की आजही अनेक जण 90s च्या काळात रहवून जातात. आजवर पंकज उदास यांची असंख्य गाणी गाजली. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे कलाविश्वापासून चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उदास यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांची अनेक गाणी त्याकाळी लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर त्या गाण्यांमुळे अनेक कलाकारही प्रकाशझोतात आले. यामध्येच और आहिस्ता या गाण्यामुळे अभिनेत्री समीरा रेड्डी प्रचंड लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर या गाण्यामुळे चक्क तिला लग्नाची मागणी येऊ लागली होती.

पंकज उदास यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांमध्ये और आहिस्ता या गाण्याचा आवर्जुन समावेश केला जातो. या गाण्यातून समीराने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या पहिल्याच गाण्यामुळे ती कमालीची लोकप्रिय झाली. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या गाण्याविषयी आणि पंकज उदास यांच्याविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

"ज्या काळात सुंदर गाणी आणि सुंदर म्युझिक व्हिडीओ तयार केले जायचे त्या काळाचा मी भाग असणं हे माझ्यासाठी फार अभिमानास्पद आणि सौभाग्याची गोष्ट आहे. त्या काळात गाण्यांचं जे सौंदर्य होतं ते सध्या फारसं पाहायला मिळत नाही. तो असा एक काळ होता ज्याला आपण कधीच विसरु शकत नाही. ती गाणी आणि पंकज उदास यांना विसरणं शक्य नाही. ते एक लेजेंड होते. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकलं आणि काळजात एकदम धस्स झालं", असं समीरा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "खरं तर हे ऐकायला फार विचित्र वाटेल. पण, मी या गाण्याचं ऑस्ट्रेलियामध्ये शूट केलं.मात्र, त्यावेळी कधीच पंकज उदास यांची भेट झाली नाही. आमचे दोन वेगवेगळे शुटिंग स्पॉट होते. पण, मी त्यांची आणि माझी भेट अनेक वर्षांनी झाली. एका कार्यक्रमात आमची पहिली भेट झाली. ते समोर आले आणि माझ्याकडे पाहून छान हसले. इतकंच नाही तर, आपलं गाणं हिट झाल्यानंतर अखेर आता आपल्या भेटीचा योग जुळून आला", असंही ते मला म्हणाले.  

दरम्यान, "त्या गाण्याची मी कायम ऋणी असेन कारण त्या गाण्याने मला खूप काही दिलं. त्या गाण्यानंतर मला अनेक लग्नाचे प्रस्ताव आले. माझ्या फिल्मी करिअरची सुरुवातही त्याच गाण्यापासून झाली. हे गाणं म्हणजे माझ्या करिअरमधील माइल स्टोन आहे. मी त्यांना आवर्जून सांगितलं की त्यांच्याच गाण्यामुळे मी अभिनेत्री झाले. लोकांनी मला त्या गाण्यात पाहिलं आणि मला अनेक रोल ऑफर झाले."

टॅग्स :समीरा रेड्डीसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडसंगीत