बॉक्स ऑफिसवर सध्या 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर' या दोन बॉलिवूड सिनेमांची तगडी टक्कर होत आहे. १ डिसेंबरला हे दोन्ही बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमांचे शो हाऊसफुल होत आहेत. सर्वत्र रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ची चर्चा सुरू असताना विकी कौशलचा 'सॅम बहादूर' बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर देत आहे. 'ॲनिमल' बॉक्स ऑफिस गाजवत असताना 'सॅम बहादूर' प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ११ दिवसांत या सिनेमाने ४४३ कोटींचा गल्ला जमवला आहे. 'ॲनिमल'च्या वादळात 'सॅम बहादूर' बॉक्स ऑफिसवर घट्ट पाय रोवून उभा आहे. या सिनेमाने ११ दिवसांत ५८ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'सॅम बहादूर' बॉक्स ऑफिसवर 'ॲनिमल'ला तगडी टक्कर देत असल्याचं दिसत आहे.
'सॅम बहादूर' सिनेमातून भारतीय लष्करातील फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला. विकी कौशलने या सिनेमात सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शन केलेल्या 'सॅम बहादूर'मध्ये विकीबरोबर सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत.