Join us  

Salman Khan House Firing: तगडी सुरक्षा, पोलिसांचा ताफा; गोळीबार घटनेनंतर सलमान खान पहिल्यांदाच 'गॅलक्सी' बाहेर पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:21 AM

Salman Khan House Firing: पोलिसांच्या ताफ्यासह सलमान खान बाहेर आला अन्...

दबंग अभिनेता सलमान खानवर (Salman Khan) नुकताच जीवघेणा प्रसंग ओढावला. त्याच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर परवा पहाटे दोन गुंडांनी गोळीबार केला. पहाटे 4 वाजता दोन गुंड दुचाकीवर आले आणि त्यांनी ४ गोळ्या झाडल्या. ही सलमान खानला दिलेली चेतावनी होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी घेतली. या सर्व घटनेनंतर सलमान खान काल गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर पडला. यावेळी त्याच्या भोवती तगडी सुरक्षा पाहायला मिळाली. 

सलमान खानचा गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियालवर व्हायरल होतोय. बुलेटप्रुफ कारमध्ये बसून सलमानचा ताफा घराबाहेर पडला. त्याच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत ज्यांना सायरनही आहे. अगदी वेगात त्याची कार अपार्टमेंटबाहेर येते आणि पुढे जाते.  इतकंच नाही तर सलमानच्या घराबाहेर २४ तास पोलिस सुरक्षा दिसत आहे. गोळीबाराच्या प्रकरणानंतर सलमान खानच्या सुरक्षेत आता कोणतीच कसर सोडली जाणार नाही असंच चित्र दिसतंय. 

सलमान खानला याआधीही धमकीवजा चिठ्ठी आली होती. तेव्हाच त्याला Y+ सुरक्षा पुरवण्यात आली होती. तरी हा प्रसंग ओढवल्याने आता आणखी सुरक्षा वाढवण्यात येऊ शकते. तर दुसरीकडे गोळीबार करणाऱ्या दोन्ही गुंडांना गुजरातच्या भूजमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आता काय अधिकची माहिती मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

काहीही झालं तरी काम सुरु ठेवणार

गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानने आपल्या टीमला एकच सांगितलं की काहीही झालं तरी कामावर परिणाम होणार नाही. सर्व शूट वेळेतच पार पडतील. त्यात बदल करु नका. धमक्या आधीही आल्या आहेत पण तेव्हाही काम सुरुच होतं आणि आताही राहील.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडगोळीबारमुंबई पोलीस