Join us  

किसी का भाई किसी की जान: 'येंतम्मा' गाण्याचा भन्नाट टीझर पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 6:57 PM

Kisi ka bhai kisi ki jaan: हिंदी-तेलुगू फ्युजन असलेले सिनेमातील चौथं गाणं 'येंतम्मा' चा टीझर रिलीज झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' (kisi ka bhai kisi ki jaan) या आगामी सिनेमामुळे चर्चेत येत आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सलमान या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आतापर्यंत या सिनेमातील बरीच गाणी प्रदर्शित झाली असून नुकताच एका नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

आतापर्यंत या सिनेमातील 'नैयो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'फॉलिंग इन लव्ह' आणि 'बठुकम्मा' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर या सिनेमातील आणखी एका गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.  हिंदी-तेलुगू फ्युजन असलेले सिनेमातील चौथं गाणं 'येंतम्मा' चा टीझर रिलीज झाला आहे.

या टीझरमध्ये सलमान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये दिसत आहेत. हिंदी-तेलुगूचे फ्युजन असलेल्या आणि जानी मास्टर यांनी कोरियोग्राफी केलेल्या 'येंतम्मा'या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत तर, पायल देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तसेच, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायले असून, रफ्तारने रॅप केले आहे. हे गाणं ४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

 गाण्याच्या टीझरच्या शेवटी डान्स फ्लोअरवर सलमान खान आणि व्यंकटेशसोबत एक मिस्ट्री मॅनची एन्ट्री होते. हे पाहून सर्वांना प्रश्न पडला आहे की हा मिस्ट्री मॅन राम चरण तर नाही ना? . याआधी, हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर राम चरण, सलमान आणि व्यंकटेश यांना एकत्र स्पॉट केल्याच्या चर्चा होत्या.  सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. 

दरम्यान, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर ही कलाकार मंडळी झळकली आहेत. 

टॅग्स :बॉलिवूडसलमान खानसिनेमा