Join us  

ब्रीदच्या दुसऱ्या सिझनमध्ये आर. माधवन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 7:23 PM

ब्रीद या वेबसिरिजच्या यशानंतर आता या वेबसिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागात माधवन मुख्य भूमिकेत दिसणार नाहीये.

ठळक मुद्देब्रीद या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन, सैयामी खेर आणि नित्या मेनन झळकणार आहेत. वेबसिरिजमध्ये काम करण्याची अभिषेक, सैयामी यांची ही पहिलीच वेळ आहे.

आर माधवन आणि अमित सध यांच्या मुख्य भूमिका असलेली ब्रीद ही वेबसिरिज चांगलीच गाजली होती. ही वेबसिरिज प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमवर पाहायला मिळाली होती. ही सीरीज मानसिक नाट्यावर आधारित असून या वेबसिरिजच्या कथानकाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले होते. ब्रीद या मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या वेबसिरिजच्या यशानंतर आता या वेबसिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण आर. माधवनच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागात माधवन मुख्य भूमिकेत दिसणार नाहीये. या सिझनच्या शेवटच्या भागात माधवन साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता दुसऱ्या सिझनमध्ये माधवन ऐवजी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. 

ब्रीद या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन, सैयामी खेर आणि नित्या मेनन झळकणार आहेत. वेबसिरिजमध्ये काम करण्याची अभिषेक, सैयामी यांची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या सिझनप्रमाणेच या सिझनध्ये देखील अमित इन्स्पेक्टर कबीर सावंत हीच भूमिका साकारणार आहे. बीद्रच्या पहिल्या सिझनचे दिग्दर्शन मयंक शर्मा यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनच्या दिग्दर्शनाची धुरा देखील तेच सांभाळणार आहेत. याविषयी ते सांगतात, ब्रीदच्या पहिल्या सिझनचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. त्यामुळे आता आमची जबाबदारी अधिक वाढणार आहे. या सिझनचे कथानक देखील तितकेच उत्कंठावर्धक असणार आहे.

या वेबसिरिजमध्ये काम करण्याविषयी सैयामी सांगते, ब्रीदचा पहिला सिझन मला खूपच आवडला होता. त्यामुळे मला दुसऱ्या सिझनबाबत विचारल्यानंतर मी प्रचंड खूश झाले होते. अभिषेक बच्चनसोबत काम करायला मिळत असल्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. तो अतिशय मजेशीर असून त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. दिग्दर्शक मयांक यांना प्रत्येक दृश्यात काय अपेक्षित आहे याची त्यांना चांगलीच कल्पना असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मजा येत आहे. या वेबसिरिजद्वारे मी डिजिटल क्षेत्रातील माझ्या करियरला सुरुवात करत असल्याचा मला आनंद होत आहे. 

टॅग्स :आर.माधवनअभिषेक बच्चनसंयमी खेर