Join us

​संजय दत्तच्या मुलीच्या रुपात दिसणार सायशा सहगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 20:31 IST

अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ‘मेरी कोम’ व ‘सरबजीत’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन ...

अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ‘मेरी कोम’ व ‘सरबजीत’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे ओमंग कुमार यांच्या ‘भूमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असून हा चित्रपट ४ आॅगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची शूटिंग फरवरी महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात संजयच्या मुलीची भूमिका अजय देवगनच्या ‘शिवाय’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी सायशा सहगल साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली असून यात असलेली माझी भूमिका सशक्त असल्याचे सांगितले होते. वडील आणि  मुलगी यांच्या नात्यावर आधारित असलेला ‘भूमी’ हा चित्रपट भावनाप्रधान व संवेदनशील विषयावर आधारित आहे. भूषण कुमार यांच्या टी-सिरीज आणि संदीप सिंग व ओंमग कुमार यांचा लिजेंड स्टुडिओ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून त्यात ताजमहल दिसत असल्याने ही प्रेम कथा असू शकते असा अंदाज लावला जात आहे. मात्र यात संजयची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे. ‘भूमी’ हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या जागेवर खिळवून ठेवणारा असून, यात भावना, बदला व पिता व मुलगी यांच्यातील नातेसंबंध केंद्रस्थानी असतील असे सांगून निमार्ता भूषण कुमार व सहनिमार्ता संदीप सिंग यांनी संजय दत्त आमच्याच चित्रपटातून कमबॅक करणार असल्याचा दावा केला होता. तो दावा आता खरा ठरणार असल्यचे दिसते. ‘भूमी’ची शूटिंग आगरा व उत्तर प्रदेशात करण्यात येणार असून फेब्रुवारी २०१७ पासून याला सुरुवात होणार आहे. दरम्यान सायशा सहगलची बॉलिवूडमधील वाटचाल चांगली सुरू झाली असल्याचे दिसते. पहिलाच चित्रपट अजय देवगन सोबत तर दुसरा चित्रपट संजय दत्त सोबत मिळाल्याने ती नक्कीच आनंदी असेल. यात सायशाची भूमिका संजय दत्तच्या तोडीची असल्याचे सांगण्यात येत आहे.